वाशिम रेल्वे स्टेशन परिसरात अज्ञात महिलेची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळालं आहे. या घटनेतील आरोपीला वाशिम पोलिसांनी अटक केली असून आरोपीने महिलेवर बलात्कार करून त्यानंतर तिची हत्या केल्याची कबुली दिली आहे. मात्र, या प्रकरणातील अंतिम निष्कर्ष शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
काल दुपारी वाशिम रेल्वे स्टेशन परिसरात सुमारे ४५ ते ५० वयोगटातील एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. महिलेचं डोकं दगडाने ठेचलेलं असून तिची अतिशय निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आल्याचं प्रथमदर्शनी स्पष्ट झालं. घटनास्थळावरून पोलिसांना दारूच्या बाटल्या, पॅन्टचा बेल्ट आणि खाण्याचं साहित्य आढळून आलं होतं. त्यामुळे महिलेवर आधी लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची आणि त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने हत्या करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात होती.
या गंभीर प्रकरणाचा तपास करत असताना वाशिम पोलिसांनी संतोष रामराव खंडारे या आरोपीला अटक केली आहे. पोलिस चौकशीत आरोपीने महिलेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची कबुली दिली आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून सध्या शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू आहे. पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतरच बलात्कार आणि हत्या याबाबतची अधिकृत माहिती स्पष्ट केली जाईल.