राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शिक्षण मंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यंदापासून प्रत्येक परीक्षा केंद्रातील प्रत्येक खोलीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. या निर्णयामुळे परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता येणार असून, कॉपी, गोंधळ किंवा इतर अनुचित प्रकारांना आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) माहितीनुसार, बारावीची लेखी परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत होणार आहे. त्यापूर्वी, तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा 23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2026 दरम्यान पार पडणार आहेत. दहावीच्या परीक्षांचे वेळापत्रकही लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. राज्यातील तब्बल 17 लाख 29 हजार शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची पुनर्रचना करण्यास केंद्राने मान्यता दिली आहे. या अंतर्गत एकूण 26 हजार 658 कोटी 77 लाख रुपयांचे कर्ज पुनर्रचित करण्यात येणार असून, यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे.
मुंबईतील पश्चिम आणि मध्य रेल्वेला जोडणारा महत्त्वाचा एल्फिन्स्टन पूल अखेर नव्या रूपात उभा राहण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. मुंबई महापालिका आणि रेल्वे प्रशासनाच्या समन्वयातून सुरू असलेले या पुलाचे काम सप्टेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. याचबरोबर, सध्या वापरात नसलेल्या ब्रिटीशकालीन जुन्या पुलाचा सांगाडा पुढील दोन महिन्यांत हटवण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
एल्फिन्स्टन पूल हा परळ, दादर आणि लोअर परळ परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. दररोज लाखो प्रवासी आणि वाहनचालक या मार्गाचा वापर करतात. जुना पूल धोकादायक अवस्थेत गेल्यानंतर तो बंद करण्यात आला होता. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, प्रवाशांची गैरसोय आणि स्थानिक नागरिकांचे हाल होत होते. या पार्श्वभूमीवर नवीन पुलाच्या कामाला गती देण्यात आली आहे.
(Iran Protest) महागाईच्या विरोधात इराणमध्ये संघर्ष सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. वाढत असलेल्या महागाईच्या मुद्द्यावर इराणमध्ये निदर्शने सुरू केली आहेत. 28 डिसेंबर रोजी इराणमध्ये ही निदर्शने सुरू झाली. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी अमेरिका आणि इस्रायलवर ही अस्थिरता पसरवण्याचा आरोप केला आहे. याच पार्श्वभूमीवर इराणमध्ये गेल्या काही दिवसांपासून जे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.या आंदोलनादरम्यान आतापर्यंत सुमारे 500 सुरक्षा कर्मचाऱ्यांसह किमान 5 हजार लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती या भागातील एका इराणी अधिकार्याने दिल्याची माहिती मिळत आहे. यातच या संघर्षात हजारो लोकांचा मृत्यू झाल्याचेही इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी मान्य केले आहे.
मुंबईत लवकरच 30 मजली ‘बिहार भवन’ उभे राहणार असून, बिहारमधील भाजप-जेडीयू सरकारने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला प्रशासकीय आणि आर्थिक मंजुरी दिली आहे. महाराष्ट्रात सध्या महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच बिहार सरकारने घेतलेला हा निर्णय राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने या प्रकल्पासाठी तब्बल 314 कोटी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. बिहारमध्ये सध्या भाजप आणि जनता दल (युनायटेड) यांची सत्ता असून, नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुंबईतील बिहार भवन प्रकल्पाला हिरवा कंदील देण्यात आला. हे भवन मुंबई पोर्ट ट्रस्टच्या हद्दीतील एल्फिन्स्टन इस्टेट परिसरात उभारण्यात येणार आहे. सुमारे 0.68 एकर जागेवर 30 मजली इमारत उभी राहणार असून, ही इमारत मुंबईतील बिहारी नागरिकांसाठी महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे.
f
मागील काही दिवसांपासून राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये कडाक्याची थंडी अनुभवायला मिळत असताना, महाराष्ट्रात मात्र काही काळ थंडी कमी झाल्याचे जाणवत होते. मात्र आता भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यासाठी शीतलहरीचा मोठा इशारा दिला असून, येत्या काही दिवसांत थंडी पुन्हा जोर धरू शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये किमान तापमानात 3 ते 4 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण होण्याची शक्यता आहे. विशेषतः धुळे जिल्ह्यात राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली असून, येथे 9 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे. गोंदिया येथे 9.8 अंश, तर यवतमाळ आणि परभणी येथे 10 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आहे. यामुळे सकाळी आणि रात्री नागरिकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे.
राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपने दमदार कामगिरी करत सर्वात मोठा पक्ष म्हणून आपली सत्ता सिद्ध केली आहे. भाजपने केवळ सर्वाधिक जागा जिंकल्या नाहीत, तर स्ट्राईक रेटच्या बाबतीतही सर्व पक्षांना मागे टाकले आहे. मुंबईत भाजपने 135 जागा लढवल्या असून, त्यापैकी तब्बल 89 जागांवर विजय मिळवला आहे. म्हणजेच भाजपचा यशाचा स्ट्राईक रेट तब्बल 66 टक्के इतका राहिला आहे. या निकालामुळे मुंबईच्या राजकारणात भाजपची ताकद अधिक ठळकपणे समोर आली आहे. महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी आवश्यक संख्येच्या जवळ भाजप पोहोचला असून, महायुतीच्या माध्यमातून सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे. भाजपची ही कामगिरी संघटनात्मक ताकद, प्रभावी प्रचार आणि उमेदवार निवडीचा परिणाम असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह कोणाच्या मालकीचे, याबाबतचा बहुचर्चित वाद आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. येत्या बुधवारपासून सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची अंतिम सुनावणी सुरू होणार असून, सलग दोन दिवस युक्तिवाद ऐकून घेतले जाणार आहेत. सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ या ऐतिहासिक प्रकरणावर सुनावणी घेणार आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या सुनावणीदरम्यानच न्यायालयाने अंतिम सुनावणीचा संकेत दिला होता. त्यामुळे आता या प्रकरणावर लवकरच निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
(Chhatrapati Sambhajinagar) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जळगाव महामार्गावर तरुणांकडून हुल्लडबाजी करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. जळगाव महामार्गावरील फुलंब्री-सिल्लोड रस्त्यावर हुल्लडबाजी करत वाहतुकीस अडथळा निर्माण करण्यात आला. बैलगाडी आणि दुचाकी रस्त्यात आणून तरुणांनी गोंधळ घातल्याचे पाहायला मिळाले. तरुणांच्या रात्रीच्या या गोंधळामुळे महामार्गावर अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हुल्लडबाज करणाऱ्या तरुणांवर कठोर कारवाई करण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे.
मुंबई महानगरपालिकेतील महापौर पदाच्या निवडीपूर्वीच राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, मंत्री उदय सामंत यांच्या सूचक वक्तव्यामुळे नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. “महायुतीचा महापौर ठरला, की काही लोक नॉट रिचेबल असतील,” असे विधान करत सामंत यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांवर निशाणा साधला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे मुंबईच्या राजकारणात नेमका कोण ‘नॉट रिचेबल’ होणार, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. सध्या महापालिकेतील सत्तास्थापनेसाठी महायुतीकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर काही नगरसेवकांना मुंबईतील नामांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. यावर भाष्य करताना उदय सामंत म्हणाले, “नगरसेवक हॉटेलमध्ये आहेत, याचा अर्थ काही तरी वेगळंच चाललंय असा फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यात कोणतंही गैर नाही. आमचे नगरसेवक सुरक्षित आहेत आणि पक्षाच्या संपर्कात आहेत.”
हैदराबाद गॅझेटनुसार नूसार बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे (ST) आरक्षण मिळावे, या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून बंजारा समाजाने सातत्याने आंदोलन केले. विविध ठिकाणी मोठे मोर्चे काढण्यात आले होते. या आंदोलनाची दखल घेत महाराष्ट्र सरकारने हिवाळी अधिवेशन व नगराध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन महिन्यांचा कालावधी दिला होता; मात्र हा कालावधी संपूनही निर्णय झालेला नाही. याच्या निषेधार्थ 18 जानेवारी रोजी संभाजीनगर येथील संत सेवालाल महाराज मंदिरात बंजारा युवकांची बैठक झाली. सरकारने तात्काळ निर्णय न घेतल्यास मुंबईतील आझाद मैदानावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.