दिल्लीतील एका शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. आज सकाळी ई-मेलद्वारे धमकी मिळाल्याची माहिती मिळत असून पोलिसांचे पथक शाळेत पोहोचले आहे.
नागपुरात आज आणि उद्या पाणीपुरवठा बंद राहणार आहे. जलवाहिनी दुरुस्तीचे काम करण्यासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आज दुपारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत ही बैठक होणार असून बैठकीत सर्व अतिरिक्त मुख्य सचिव उपस्थित राहणार आहेत.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत मंगळवारी मारकडवाडी गावाच्या दौऱ्यावर जाणार असून त्याच दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देखील मारकडवाडी दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मिळत आहे.
मारकडवाडी पाठोपाठ ईव्हीएमविरोधात राज्यभर नागरिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत असून बॅलेट पेपरवरच मतदान घेण्याची मागणी करण्यात येत आहे.
पुणे जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार ईव्हीएमविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार आहेत. महाविकास आघाडीचे सर्व पराभूत उमेदवार आज दिल्लीत दाखल होणार असून सर्व उमेदवार सुप्रीम कोर्टाच्या वकिलांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
बेस्टमधील नव्या विद्युत मीटरविरोधात मुंबईत आज बैठक होणार आहे. बेस्ट महासंचालकांच्या दालनात दुपारी 2 वाजता ही बैठक होणार आहे.
मुंबईच्या किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली असून पुढील 2 ते 3 दिवसात तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे.
आज विशेष अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. आज उर्वरित नवनिर्वाचित 8 आमदारांचा शपथविधी होणार आहे.
राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार असल्याची माहिती मिळत आहे. कारण राहुल नार्वेकरांविरोधात कोणत्याही पक्षाकडून दुसरा अर्ज दाखल न झाल्यानं त्यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार आहे.
विधिमंडळ कामकाज समितीची आज बैठक असून बैठकीत हिवाळी अधिवेशनाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.