थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या आक्रमक आणि धक्कादायक निर्णयांमुळे नेहमीच जागतिक चर्चेत राहिले आहेत. आता त्यांनी पुन्हा एकदा असा मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे संपूर्ण जगाच्या आरोग्य व्यवस्थेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटना (WHO) मधून बाहेर पडण्याचा घेतलेला निर्णय आजपासून अधिकृतपणे लागू होत आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक वादग्रस्त निर्णय घेतले आहेत. त्यांनी काही प्रमुख देशांवर मोठ्या प्रमाणावर टॅरिफ लादून ‘टॅरिफ वॉर’ सुरू केला. या टॅरिफच्या फटक्यात भारताचाही समावेश असून, भारत रशियाकडून तेल खरेदी करतो या कारणावरून अमेरिकेने भारतावर तब्बल ५० टक्के टॅरिफ लादला आहे. ऑगस्ट २०२५ पासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. याशिवाय ट्रम्प प्रशासनाने अनेक देशांवरील व्हिसा धोरण कडक करत काही देशांना अमेरिकन व्हिसावर थेट बंदी घातली आहे.
याच दरम्यान ट्रम्प यांनी व्हेनेझुएलावर कारवाई करत तेथील राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना अटक केल्याचा दावा केला होता. तसेच, ग्रीनलँडवर ताबा मिळवण्याच्या त्यांच्या भूमिकेमुळेही जागतिक राजकारण तापले आहे. या निर्णयाला विरोध करणाऱ्या युरोपीय देशांवर ट्रम्प यांनी १० टक्के टॅरिफ लावला असून, गरज पडल्यास तो वाढवण्याची धमकीही दिली आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर आता अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय अंमलात आणल्याने मोठी खळबळ उडाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्रपती कार्यकाळातील ही दुसरी वेळ आहे, जेव्हा अमेरिका WHO मधून बाहेर पडत आहे. अमेरिकन कायद्यानुसार कोणत्याही जागतिक संघटनेतून बाहेर पडण्यासाठी एक वर्ष आधी नोटीस देणे आवश्यक असते. ट्रम्प यांनी २०२५ मध्ये राष्ट्रपतीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी WHO ला अधिकृत नोटीस दिली होती.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते अमेरिकेच्या या निर्णयाचा सर्वात मोठा फटका गरीब आणि विकसनशील देशांना बसू शकतो. कारण अमेरिका ही WHO मधील सर्वात मोठी दाता देश आहे. सध्या अमेरिकेचे संयुक्त राष्ट्र संघाकडे सुमारे २६० मिलियन डॉलर थकित असल्याचेही सांगितले जाते. अमेरिकेच्या माघारीमुळे जागतिक आरोग्य संघटनेच्या अनेक कार्यक्रमांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अमेरिका अधिकृतपणे जागतिक आरोग्य संघटना (WHO) मधून बाहेर
ट्रम्प यांच्या कार्यकाळातील दुसरी वेळ WHO मधून माघार
विकसनशील व गरीब देशांवर सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता
जागतिक आरोग्य कार्यक्रम व निधीवर परिणामाची तज्ज्ञांना चिंता