अमेरिका आणि भारतातील मोठ्या व्यापारी डीलनंतर व्हाईट हाउसने दावा केला होता की, भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी बंद करण्यास आणि अमेरिकेकडून आयात वाढवण्यास सहमती दर्शवली आहे. मात्र, रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने हा दावा ठामपणे फेटाळला आहे.
अधिकृत निवेदनात रशियाने म्हटले आहे की, त्यांच्याकडे अद्याप भारताकडून तेल खरेदी बंद करण्याची कोणतीही औपचारिक माहिती आलेली नाही आणि असा कोणताही पुरावा नाही. उलट, भारत-रशिया ऊर्जा व्यापार दोन्ही देशांसाठी फायदेशीर असून, आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजारात स्थिरता निर्माण करतो आहे. व्हाईट हाउसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बोलणींतर भारताने रशियन तेल खरेदी थांबवण्यास आणि अमेरिकन तेल आयातीला प्राधान्य देण्यास सहमती दिली आहे.
मात्र, भारत सरकारकडून यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. रशियाने स्पष्ट केले की, भारत-रशिया ऊर्जा सहकार्य मजबूत आहे आणि कोणत्याही बदलाची कल्पना नाकारली. रॉयटर्सच्या अहवालानुसार, जानेवारी महिन्यात भारताने रशियन तेलाची आयात काही प्रमाणात कमी केली आहे, पण पूर्णपणे थांबवलेली नाही.
जागतिक ऊर्जा बाजारातील बदल, प्रतिबंध आणि व्यापारी डील्समुळे हे घडले असावे. भारत, जागतिक तिसरा सर्वात मोठा तेल आयातदार, रशियाकडून स्वस्त तेल घेऊन ऊर्जा सुरक्षित ठेवतो आहे. अमेरिकेच्या दाव्याने भू-राजकीय तणाव वाढवला असून, भारताची भूमिका काय राहील यावर लक्ष केंद्रित आहे.