राजस्थानमधील २५ वर्षीय तरुण धार्मिक प्रवचिका साध्वी प्रेम बाईसा यांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. तापावर उपचार सुरू असतानाच त्या अचानक कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक दावा करण्यात येत असला, तरी हा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप करत भाविकांनी तीव्र आंदोलन सुरू केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी साध्वी प्रेम बाईसा यांना त्यांच्या आश्रमातच तापासाठी उपचार दिले जात होते. त्याच दरम्यान त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्या बेशुद्ध पडल्या. यानंतर त्यांचे वडील आणि एका तरुणाने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, सायंकाळी सुमारे सहा वाजताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी पश्चिम जयपूरचे सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) छवी शर्मा यांनी सांगितले की, “साध्वी प्रेम बाईसा यांना कारमधून रुग्णालयात आणण्यात आले होते. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले.”
दरम्यान, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट व्हावे यासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
दरम्यान, साध्वीचा मृत्यू संशयास्पद असल्याचा दावा करत त्यांच्या भक्तांनी आणि समर्थकांनी निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. काही ठिकाणी निदर्शनेही करण्यात आली असून, संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास व्हावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.