Ajit Pawar Plan Crash Update 
महाराष्ट्र

Ajit Pawar Plan Crash Update : मृतदेह सुजल्याचा डॉक्टरांचा उल्लेख, रोहित पवारांचे नवे प्रश्न; सखोल चौकशीची मागणी तीव्र

Rohit Pawar Questions: बारामतीजवळ झालेल्या अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर रोहित पवारांनी मृतदेहाच्या सुजण्यापासून पायलट बदल व तांत्रिक त्रुटीपर्यंत अनेक प्रश्न उपस्थित केले.

Published by : Dhanshree Shintre

बारामतीजवळ 28 जानेवारी 2026 रोजी घडलेल्या विमान दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर या प्रकरणातील चौकशी अद्याप सुरू आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी मुंबईनंतर दिल्लीत पत्रकार परिषद घेत अनेक नवे मुद्दे समोर आणले. मृतदेहाच्या अवस्थेबाबत डॉक्टरांनी दिलेल्या माहितीसह पायलट बदल, तांत्रिक बाबी आणि कंपनीच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

मृतदेहाबाबत नवा खुलासा

दिल्लीतील पत्रकार परिषदेत रोहित पवार म्हणाले की, डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार यांचे शरीर “असामान्यरीत्या सुजलेले” होते. “भाजल्यावर शरीर सुजते का, असा प्रश्न मी डॉक्टरांना विचारला असता त्यांनी होकार दिला; मात्र सुजण्याचे प्रमाण जास्त असल्याचे सांगितले,” असे ते म्हणाले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या छायाचित्रांमुळे मृतदेहाबाबत संभ्रम निर्माण झाला होता, याचाही त्यांनी उल्लेख केला. या स्थितीमागील कारणांची तपासणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

अपघात की घात?

रोहित पवार यांनी अपघाताच्या स्वरूपावरही प्रश्न उपस्थित केले. “दादा कारने पुण्याला जाणार होते, मग विमानप्रवासाचा निर्णय कसा आणि का झाला?” असा सवाल त्यांनी केला. उड्डाणाच्या आधी दोन पायलट नियुक्त असताना ऐनवेळी त्यांची अदलाबदल का करण्यात आली, याचे स्पष्टीकरण मागितले. संबंधित पायलटच्या पूर्वीच्या नोंदी, शिस्तभंगाच्या तक्रारी आणि अल्कोहोल चाचणीसंबंधी वाद यांचा उल्लेख करत त्यांनी व्हीआयपी उड्डाणासाठी अशा पायलटची निवड कशी झाली, असा प्रश्न विचारला.

तांत्रिक मुद्द्यांवर शंका

दुर्घटनेपूर्वीच्या शेवटच्या क्षणांबाबत स्पष्टता नसल्याचे सांगत त्यांनी काही मुद्दे पुढे केले.

शेवटच्या एका मिनिटात नेमके काय घडले?

विमानाचा ट्रान्सपोंडर कार्यरत का नव्हता?

दृश्यमानता ३००० मीटर असताना लँडिंगचा निर्णय का घेण्यात आला?

रनवे ११ ऐवजी रनवे २९ निवडला असता परिस्थिती वेगळी राहिली असती का?

डीजीसीएच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन झाले होते का, याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. उड्डाणापूर्वीची वैद्यकीय तपासणी, अल्कोहोल टेस्ट, विमानाची नियमित देखभाल आणि मेंटेनन्स नोंदी सार्वजनिक कराव्यात, असेही ते म्हणाले.

कंपनी व ऑपरेटरवर आरोप

अजित पवार यांना घेऊन जाणाऱ्या व्हीएसआर कंपनीच्या भूमिकेवर रोहित पवार यांनी टीका केली. हवामानामुळे दुर्घटना झाल्याचा दावा करण्यात आला; मात्र सीसीटीव्ही फुटेजमधील परिस्थिती वेगळी असल्याचा दावा त्यांनी केला. ऑपरेटरचा पूर्वीचा सुरक्षा रेकॉर्ड, पायलटचे ड्युटी तास, इंधन व्यवस्थापन आणि मानक कार्यपद्धती (SOP) यांचे पालन झाले का, याची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.

पारदर्शक आणि वेळबद्ध चौकशीची मागणी

“या घटनेबाबत कोणाच्याही मनात संशय राहू नये. म्हणून स्वतंत्र, निष्पक्ष आणि वेळबद्ध चौकशी होणे अत्यावश्यक आहे,” असे रोहित पवार यांनी ठामपणे सांगितले. आवश्यक असल्यास आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक संस्थांचा सहभाग घ्यावा, असेही त्यांनी सुचवले. सत्य समोर येणे हीच दिवंगत नेत्याला खरी श्रद्धांजली ठरेल, असे ते म्हणाले.

दरम्यान, या गंभीर आरोपांवर अधिकृत चौकशी अहवालाची प्रतीक्षा कायम आहे. राज्यातील राजकीय वातावरणात या प्रकरणामुळे नव्या चर्चा रंगू लागल्या असून, पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा