थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
बदलापूरमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी इमरान पटेल याला आज बदलापूर पोलिसांनी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले. न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे यांच्या समोर झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने आरोपीला २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासाच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात असून, गुन्ह्यात वापरण्यात आलेली स्कूल व्हॅन पोलिसांनी जप्त केली आहे.
या प्रकरणात तपास सुरू असतानाच आरटीओकडूनही आरोपीवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. तपासादरम्यान आरोपीकडे स्कूल व्हॅन चालवण्यासाठी आवश्यक असलेला अधिकृत आरटीओ परवाना नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरटीओ विभागाने आरोपी इमरान पटेल याच्यावर २४ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. शालेय वाहतुकीत होत असलेल्या गंभीर निष्काळजीपणाचा हा आणखी एक पुरावा असल्याचे बोलले जात आहे. या घटनेची गंभीर दखल घेत राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे. पीडित चिमुकलीला तातडीने न्याय मिळावा तसेच शाळा आणि स्कूल व्हॅन व्यवस्थेतील सुरक्षेतील त्रुटींचा सखोल आढावा घेण्यासाठी आयोगाकडून पावले उचलली जात आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण ?
बदलापूर पश्चिमेतील एका खासगी शाळेत चार वर्षांची चिमुकली नर्सरीमध्ये शिक्षण घेत होती. नेहमीप्रमाणे ती दुपारी १२.३० वाजता स्कूल व्हॅनमधून घरी परतणे अपेक्षित होते. मात्र, ती वेळेत घरी न परतल्याने आईने व्हॅन चालकाला फोन करून चौकशी केली. सुमारे दीड तास उशिराने चिमुकली घरी परतली. त्यावेळी ती अत्यंत घाबरलेली होती. आईने विचारपूस केल्यानंतर चिमुकलीने व्हॅन चालकाने गैरवर्तन केल्याची माहिती दिली.
यानंतर पालकांनी तात्काळ शाळेत जाऊन मुख्याध्यापिकेला प्रकार सांगितला. मात्र, शाळा प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याचा आरोप पालकांनी केला आहे. त्यानंतर पालकांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. या प्रकरणातून पुन्हा एकदा शालेय वाहतुकीतील सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्य सरकारच्या निर्देशांनुसार स्कूल व्हॅनमध्ये महिला अटेंडंट असणे बंधनकारक असताना, या व्हॅनमध्ये अटेंडंट नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आरोपी चालकासह संबंधित शाळा प्रशासनावरही कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी इमरान पटेल २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत
आरोपीकडे स्कूल व्हॅन चालवण्यासाठी आवश्यक आरटीओ परवाना नसल्याचे उघड
आरटीओकडून आरोपीवर २४ हजार रुपयांचा दंड
शालेय वाहतूक सुरक्षेवर प्रश्न; बालहक्क आयोगाकडून स्वतंत्र चौकशी सुरू