राजेश गुप्ता | लोकशाही मराठी न्यूज
मुलुंड, सार्वजनिक व सामाजिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या म. तु. अग्रवाल महानगरपालिका रुग्णालयात राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तिमत्त्वांची प्रेरणादायी तैलचित्रे लावण्यात यावीत, अशी ठाम मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राजगड १०७ विभागाचे शाखा अध्यक्ष सागर चौधरी यांनी केली आहे. रुग्णालयाच्या प्रमुख व वर्दळीच्या ठिकाणी येत्या १९ फेब्रुवारीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची तैलचित्रे लावावीत, असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे.
सागर चौधरी यांच्या म्हणण्यानुसार, रुग्णालयात उपचारासाठी येणारे रुग्ण, त्यांचे नातेवाईक तसेच कर्मचारी वर्ग यांच्यासाठी प्रेरणादायी वातावरण निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे. राष्ट्रपुरुषांची तैलचित्रे पाहून मानसिक सकारात्मकता वाढते, तणाव कमी होतो आणि उपचार प्रक्रियेलाही बळ मिळते. विशेषतः शासकीय रुग्णालयात रोज हजारो नागरिक येत असताना अशा प्रकारचे सांस्कृतिक व वैचारिक संदेश देणारे उपक्रम समाजहिताचे ठरतात, असेही त्यांनी सांगितले.
यासोबतच सध्या रुग्णालयात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना भेडसावणाऱ्या विविध गैरसोयींकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. अतिदक्षता विभाग (ICU) बंद असल्यामुळे गंभीर रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच योग्य व वेळेवर माहिती उपलब्ध न होणे, औषधे पुरवठा विभाग बंद असणे, प्रतीक्षागृहातील अपुऱ्या सुविधा, बसण्याची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसणे, स्वच्छतेचा अभाव अशा अनेक मूलभूत समस्यांमुळे रुग्णांचे हाल होत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
या सर्व बाबींची महानगरपालिका प्रशासनाने तातडीने व गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. रुग्णालय हे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असल्याने येथे कोणतीही ढिलाई चालणार नाही, असे सागर चौधरी यांनी स्पष्ट केले. आवश्यक त्या उपाययोजना त्वरित राबवून रुग्णांना होणाऱ्या गैरसोयी दूर कराव्यात, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनआंदोलन छेडेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान, या मागणीमुळे रुग्णालय प्रशासन काय भूमिका घेते आणि राष्ट्रपुरुषांची तैलचित्रे तसेच मूलभूत सुविधांबाबत कोणती ठोस पावले उचलली जातात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.