Maharashtra Politics 
महाराष्ट्र

Maharashtra Politics: उपमुख्यमंत्री शिंदेच्या हस्तक्षेपानंतर छत्रपती संभाजीनगरचा महापौर-उपमहापौर पदाचा तिढा सुटला; संजय शिरसाटांची नाराजी दूर

Chhatrapati Sambhajinagar MC: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्तक्षेपानंतर छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील महापौर-उपमहापौर निवडणुकीवरील गोंधळ संपला.

Published by : Dhanshree Shintre

मुंबईनंतर राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत अखेर सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीवरून महायुतीत सुरू असलेले अंतर्गत मतभेद आणि नाराजीनाट्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या थेट हस्तक्षेपामुळे संपुष्टात आले आहे. विशेषतः उपमहापौर पदावरून शिवसेनेत निर्माण झालेला तणाव शिंदेंनी समज दिल्यानंतर निवळल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

महायुतीतील जागावाटपानुसार भाजपकडे महापौरपद तर शिवसेनेकडे उपमहापौरपद देण्यात आले आहे. त्यानुसार भाजपकडून समीर राजूरकर यांनी महापौर पदासाठी तर शिवसेनेकडून राजेंद्र जंजाळ यांनी उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपकडून महापौर पदासाठी एकमेव अर्ज आल्याने राजूरकर यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. शिवसेनेने अधिकृत पक्षादेश (व्हिप) काढून राजेंद्र जंजाळ यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर उपमहापौर पदावरून सुरू असलेला पेच सुटल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, उपमहापौर पदासाठी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या समर्थकांनी स्वतंत्र अर्ज भरण्याची तयारी दर्शविल्याने शिरसाट नाराज असल्याच्या चर्चांना जोर आला होता. यामुळे शिवसेनेत दोन गट आमनेसामने येण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात ठाम भूमिका घेत कडक शब्दांत समज दिल्यानंतर शिरसाट समर्थकांनी माघार घेतली. यानंतर खुद्द संजय शिरसाट यांनीही राजेंद्र जंजाळ यांच्या उमेदवारीला संमती दिल्याचे सांगितले जात आहे. परिणामी, शिवसेनेकडून उपमहापौर पदासाठी अन्य कोणताही अर्ज भरला जाणार नसल्याचे स्पष्ट झाले असून महापालिकेतील सत्तास्थापनेचा मार्ग निर्विघ्न झाला आहे.

तथापि, जंजाळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल होत असताना पालकमंत्री संजय शिरसाट यांची अनुपस्थिती लक्षवेधी ठरली. यामुळे शिवसेनेतील अंतर्गत मतभेद पूर्णपणे शमले नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार अतुल सावे यांनी स्पष्टीकरण देत नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. संजय शिरसाट यांच्या मनात कोणतीही नाराजी नसून काही मुद्दे असतील तर ते थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करतील, आणि त्यांनी दिलेला शब्द शिरसाट नक्कीच पाळतील, असा विश्वास सावे यांनी व्यक्त केला.

दरम्यान, उपमहापौर पदाचे उमेदवार राजेंद्र जंजाळ यांनीही नाराजीच्या चर्चांना दुजोरा न देता स्पष्टीकरण दिले आहे. पालकमंत्री संजय शिरसाट नाराज नसल्याचे स्पष्ट करताना जंजाळ म्हणाले की, सुरुवातीला शिवसेनेच्या काही उमेदवारांनी अर्ज उचलले होते, मात्र त्यावेळी माझे नाव अधिकृतरीत्या जाहीर झाले नव्हते. पालकमंत्री सध्या निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने अर्ज भरण्यास येऊ शकले नाहीत. शिवसेनेच्या इतर उमेदवारांनी घेतलेले अर्ज दाखल केले जाणार नाहीत, त्यामुळे कोणतीही तक्रार करण्याची गरज नाही.

“पक्षाचा आदेश आमच्यासाठी अंतिम असतो. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांचा आदेश अंतिम मानला जातो. आदेशावर चालणारी ही संघटना आहे,” असे स्पष्ट करत जंजाळ यांनी पक्षातील शिस्त आणि नेतृत्वावर आपला विश्वास व्यक्त केला. एकूणच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीमुळे छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील महापौर-उपमहापौर निवडीवरील गोंधळ संपला असून, महायुतीतील समन्वय आणि एकजूट पुन्हा एकदा समोर आल्याचे चित्र सध्या स्पष्ट होत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा