मुंबई : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयात मोफत उपचार मिळणार आहेत. मंत्रिमंडळाने एकमताने हा निर्णय घेतला आहे. यामुळे गरीब, गरजू, रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. यासंबंधी आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी सातत्याने पाठपुरावा केला होती.
तानाजी सावंत यांच्या मोफत उपचाराच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. सध्या सर्व रुग्णालयात वर्षभरात उपचार घेण्यासाठी सुमारे २.५५ कोटी नागरिक येतात. राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकूण २४१८ संस्था आहेत. या सर्व ठिकाणी निःशुल्क उपचार रुग्णांना मिळणार आहेत. हा भारतीय राज्यघटनेतील आर्टिकल २१ नुसार राईट टू हेल्थ (Right to Health)चा नागरिकांना अधिकार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, स्त्री रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय यासंदर्भ सेवा रुग्णालय (Super Speciality Hospital - नाशिक आणि अमरावती), कॅन्सर हॉस्पिटल या ठिकाणी मोफत उपचार मिळणार आहेत.
याबाबत बोलताना तानाजी सावंत म्हणाले की, दररोज कोटींच्या संख्येने लोकं सरकारी रुग्णालयात उपचार घेत असतात. त्यामुळे जर याचा आर्थिक भार पडला तरी चालेल. आजपासून सर्व सरकारी रुग्णालयात नागरिकांना मोफत उपचार केला जाणार आहे. केस पेपर साठी सुद्धा पैसे द्यायची गरज नसणार आहे. आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.