KDMC Election Results 
महाराष्ट्र

KDMC Election Results: कल्याण-डोंबिवलीमध्ये राजकीय खळबळ; मनसेचा शिंदे गटाला अचानक पाठिंबा, सत्तास्थितीत मोठा बदल

Mahayuti Majority: कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिंदे गटाने ५३ नगरसेवकांसह गट स्थापन केला, मनसेने ५ नगरसेवकांसह पाठिंबा दिला.

Published by : Dhanshree Shintre

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. कोकण भवन येथे सोमवारी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत शिवसेना (शिंदे) गटाने आपले ५३ नगरसेवकांचा स्वतंत्र गट अधिकृतपणे स्थापन केला. याचवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) च्या ५ नगरसेवकांनीही स्वतंत्र गट स्थापन करत शिंदे गटाला पूर्ण पाठिंबा जाहीर केला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि मनसे माजी आमदार राजू पाटील यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीनंतर श्रीकांत शिंदे यांनी माध्यमांशी बोलत मनसेकडून मिळालेल्या समर्थनाची अधिकृत घोषणा केली.

डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले, "आज शिवसेना (शिंदे) गटाने ५३ नगरसेवकांचा गट स्थापन केला असून, मनसेनेही आपल्या ५ नगरसेवकांचा गट तयार करत आम्हाला पाठिंबा दिला आहे. आम्ही महायुतीतून निवडणूक लढलो होतो आणि केडीएमसीत महायुतीचीच सत्ता येणार आहे. महापौर महायुतीचाच होणार, बाकी कुणाचाही नाही. विकासासाठी भविष्यात इच्छुकांना सोबत घेऊ." या घोषणेने केडीएमसीतील सत्तास्थापनेची समीकरणे पूर्णपणे बदलली असून, बहुमताचा आकडा ६२ असलेल्या महापालिकेत शिंदे गट (५३) आणि भाजप (५०) यांच्यासह मनसे पाठिंब्याने महायुती मजबूत झाली आहे.

निवडणुकीत शिंदे गट सर्वाधिक नगरसेवक (५३) घेऊन सर्वात मोठा पक्ष ठरला होता, तर भाजपकडे ५०, शिवसेना (ठाकरे) गटाकडे ११ आणि मनसेकडे ५ नगरसेवक होते. निकालानंतर ठाकरे गटातील मधुर म्हात्रे आणि किर्ती ढोणे हे दोन नगरसेवक बेपत्ता झाले. नंतर कोकण विभागीय आयुक्तांकडे गटनोंदणीसाठी जाताना आणखी दोन नगरसेवक गैरहजर राहिले. हे चारही नगरसेवक आता मनसे गटात सामील झाल्याचे समजते. विशेष म्हणजे, हे दोन नगरसेवक पूर्वी मनसे कार्यकर्ते होते आणि "आम्ही पुन्हा मनसेत परतलो" अशी भूमिका घेतली आहे. यामुळे ठाकरे गटाचे संख्याबळ ११ वरून केवळ ७ वर खाली आले आहे.

शिंदे गट आणि मनसे पूर्वी एकमेकांविरुद्ध निवडणूक लढले होते, पण आता सत्तास्थापनेच्या जोरदार चर्चांमुळे हे नेते जवळ आले आहेत. मनसेकडील ५ नगरसेवकांसह ठाकरे गटातून मनसेत गेलेले २ नगरसेवक, एकूण ७ पाठिंब्याने शिंदे गटाला फायदा होत आहे. श्रीकांत शिंदे यांनी सातत्याने मनसे नेत्यांशी चर्चा केल्याचे सूत्र सांगतात. या घडामोडीमुळे ठाकरे गट कमकुवत झाला असून, महायुतीला सत्तेसाठी सोयीचा वातावरण निर्माण झाला आहे.

केडीएमसीतील या राजकीय खेळकुशलतेमुळे कल्याण-डोंबिवलीतील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत. आगामी महापौर निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, महायुतीची सत्ता निश्चित मानली जात आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा