थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. बारामतीत काल त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले. या वेळी राज्यातील सर्वच प्रमुख नेते उपस्थित होते. आता त्यांच्या जागी नवे उपमुख्यमंत्री कोण होणार, याबाबत राजकीय चर्चांना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत मंथन सुरू झाले असून, अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव या पदासाठी सर्वाधिक चर्चेत आहे.
अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारानंतर राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासह पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी झालेल्या चर्चेचा तपशील दिला. ते म्हणाले, "आमचे नेते अजित पवार यांचा अंत्यसंस्कार झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी आमची राजकीय पातळीवर सविस्तर चर्चा झालेली नव्हती. राजकीय दृष्टीने आम्ही महायुतीचे घटक पक्ष आहोत. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि आमचे विधिमंडळ गटनेते हेच उपमुख्यमंत्री होते. त्यामुळे त्या जागेबाबत निर्णय आम्हालाच घ्यावा लागणार आहे."
पटेल पुढे म्हणाले, "आम्ही मुख्यमंत्री फडणवीस यांना एवढेच सांगितले की, येत्या काही दिवसांत उपमुख्यमंत्री पदाबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागेल. यासाठी आमच्या पक्षाच्या सर्व आमदारांना बोलावून त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. जनभावनेचा आदर करून, अजित दादांची आमच्या पक्षात असलेली महत्त्वाची भूमिका लक्षात घेऊनच हा निर्णय घेतला जाईल, असे आम्ही मुख्यमंत्र्यांना कळवले आहे."
अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री बनवले जाणार का, असा प्रश्न विचारला असता प्रफुल्ल पटेल यांनी यावर स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले, "सुनेत्रा वहिनी पवार यांच्या नावाची चर्चा आज मुख्यमंत्र्यांबरोबर आम्ही केलेली नाही. तो आमचा अंतर्गत विषय आहे. त्या जागेवर कोणाला बसवायचे हा पक्षाचा निर्णय आहे. आम्ही आमदारांचे मत, जनतेची भावना आणि आमची स्वतःची भावना या सर्वांचा विचार करणार आहोत."
सध्या अजूनही राजकीय व वैयक्तिक पातळीवर शोककाळ सुरू असल्याचे पटेल यांनी नमूद केले. "घरी अजून काही धार्मिक विधी सुरू आहेत. आम्हाला या संदर्भात सुनेत्रा वहिनींशीही बोलावे लागणार आहे, पार्थ पवार, जय पवार यांच्याशीही चर्चा करावी लागेल. घरचे सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर शक्य असेल तर आज रात्री किंवा उद्या आम्ही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू. लवकरात लवकर ही जागा आम्हाला भरायची आहे," असे ते म्हणाले.
जनतेची भावना आणि पक्षातील सर्वांच्या भावनांचा आदर करूनच निर्णय होईल, असा पुनरुच्चार करत प्रफुल्ल पटेल म्हणाले, "आमचा कुणाचाही त्यांच्या नावाला विरोध नाही; पण आम्हाला त्यांच्याशी बोलून, त्यांची तयारी आणि भूमिका समजून घेणे आवश्यक आहे. त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल." त्यामुळे उपमुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सुनेत्रा पवार औपचारिकपणे पुढे येतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. महायुतीतही या निर्णयाकडे बारकाईने पाहिले जात असून, पुढील काही दिवसांत याबाबतची चित्र अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रीपद रिक्त.
प्रफुल्ल पटेल यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट.
सुनेत्रा पवार यांच्या नावावर चर्चा, मात्र निर्णय अंतर्गत असल्याचे स्पष्ट.
आमदारांची बैठक आणि जनभावनेनुसार लवकर निर्णय होणार.