उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या २८ जानेवारी रोजी झालेल्या दुर्दैवी विमान अपघातानंतर राज्यभरात शोककळा पसरली होती. या घटनेनंतर विविध तर्क-वितर्कांना उधाण आले होते. आता या अपघाताचा एक नवा आणि अधिक स्पष्ट सीसीटीव्ही व्हिडीओ आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत सादर केल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
व्हिडीओत नेमकं काय दिसतं?
रोहित पवार यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बारामती विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज सादर केले. या व्हिडीओमध्ये धावपट्टी स्पष्ट दिसत असून, अजित पवार यांचे विमान लँडिंगसाठी येताना अचानक अस्थिर झाल्याचे दिसते. विमान धावपट्टीवर सुरक्षित उतरल्याऐवजी एका बाजूला झुकत धावपट्टीच्या कडेला कोसळताना दिसते.
शेवटच्या काही सेकंदांत विमानाचा तोल जातो, त्यानंतर जमिनीवर आदळताच मोठा स्फोट होतो आणि क्षणात आगीच्या ज्वाला भडकताना दिसतात. संपूर्ण घटना काही क्षणांत घडते. हे दृश्य अत्यंत धक्कादायक असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
संशयाचे मुद्दे कोणते?
रोहित पवार यांनी या अपघातामागील काही संशयास्पद बाबींवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
1. विमान एका बाजूला का झुकले? – लँडिंगपूर्वीच विमान असंतुलित झाल्याचे दिसते. हा तांत्रिक बिघाड होता की इतर काही कारण?
2. पायलट आणि ट्रान्सपॉन्डरचा प्रश्न – अपघाताच्या आधी ट्रान्सपॉन्डर सिग्नलमध्ये अडथळा का आला? पायलटची भूमिका काय होती?
3. स्फोटाची तीव्रता – विमान जमिनीवर आदळताच इतका भीषण स्फोट कसा झाला?
4. सुरक्षेतील त्रुटी – बारामतीसारख्या सुरक्षित विमानतळावर अशी दुर्घटना कशी घडली?
5. राजकीय कटाची शक्यता – अजित पवार हे काही बाबतीत सावध झाले होते, अशा पार्श्वभूमीवर हा केवळ अपघात आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
सखोल चौकशीची मागणी
“हा व्हिडीओ पाहिल्यानंतर हा केवळ साधा अपघात वाटत नाही. यामागील सर्व सत्य बाहेर यायला हवे,” असे रोहित पवार यांनी सांगितले. या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, या नव्या व्हिडीओमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत. अपघाताच्या शेवटच्या पाच सेकंदांत नेमके काय घडले, याचे उत्तर तपासातून समोर येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.