पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी मुख्य आरोपी शितल तेजवानी यांच्याविरुद्ध १८८६ पानांचे विस्तृत चार्जशीट कोर्टात दाखल केले आहे. या आरोपपत्रात राष्ट्रवादी नेते पार्थ पवार आणि दिग्विजय यांचे नाव नसल्याने पार्थ पवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. जमीन गैरव्यवहारात फक्त शितल तेजवानी यांच्यावरच आरोप ठेवण्यात आले आहेत.
या प्रकरणात मुख्य आरोपी तेजवानी यांना जेलमध्ये ठेवण्यासाठी ६० दिवसांच्या आत चार्जशीट दाखल करणे बंधनकारक होते, त्यानुसार ते पूर्ण करण्यात आले. मात्र चार्जशीट दाखल झाले असले तरी केसचा पुढील तपास सुरूच राहणार असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. शासकीय जमिनीची परस्पर विक्री केल्याचा आरोप तेजवानी यांच्यावर आहे आणि एफआयआरमधील सर्व आरोप कायम ठेवून हे आरोपपत्र तयार करण्यात आले आहे.
पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने सांगितले की, चार्जशीट दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी यापुढेही तपास चालू राहील आणि आवश्यकता वाटल्यास इतर आरोपींविरुद्धही कारवाई होऊ शकते. या प्रकरणाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, कोर्टातील पुढील सुनावणीवर लक्ष केंद्रित झाले आहे.