थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
पुणेकरांसाठी महत्वाची वार्ता आहे. पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६ आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्यामुळे २३ जानेवारी (शुक्रवार) रोजी शहरातील मध्यवर्ती भाग आणि उपनगरातील अनेक प्रमुख रस्ते दुपारी १२ वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. विद्यापीठ रोड, एसबी रोड, बालगंधर्व रोडसह इतर रस्त्यांवर वाहतूक बंदी यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे वाहतूक पोलिसांचे आवाहन आहे. स्पर्धेमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी पुणे व पिंपरी-चिंचवडमधील सरकारी-खासगी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
स्पर्धेचा हा चौथा आणि अंतिम टप्पा बालेवाडी ते बालगंधर्व रंगमंदिरापर्यंत ५८ किलोमीटर लांबीचा आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार हे उपाययोजना करण्यात आल्या असून, पुणेकरांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. बंद रस्ते आणि पर्यायी मार्ग खालीलप्रमाणे आहेत.
राधा चौक ते सुसखिंड रोड (बेंगलोर हायवे सर्व्हिस रोड) बंद राहणार असून, हिंजवडीला जाणाऱ्यांनी बाणेर रोड-राधा चौक मार्गे सायकर चौकातून युटर्न घेऊन बालेवाडी फाट्यापासून हिंजवडीला जा. सुसगावला जाणाऱ्यांनी सायकर-ममता चौक-बेंगलोर-मुंबई महामार्ग-सुस ब्रिज-सर्व्हिस रोड-सुतारवाडी अंडरपास-सर्व्हिस रोडने पर्याय निवडावा. बावधन किंवा हायवेला जाण्यासाठी सायकर चौक-ममता चौक-पुणे-मुंबई महामार्ग हा मार्ग वापरा.
पुनम बेकरी ते पाषाण-सुस रोड-पाषाण सर्कल बंद राहील; पर्याय सुतारवाडी रोड किंवा पुणे-मुंबई हायवे. पाषाण सर्कल ते एनसीएल-अभिमान श्री सोसा-पुणे विद्यापीठ चौक बंद राहणार असल्याने बाणेर रोड मागचा मार्ग घ्या. पुणे विद्यापीठ ते ब्रह्मण चौक-राजीव गांधी ब्रिजसाठी ब्रह्मण चौक-स्पायर कॉलेज-डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक-रेजहिल्स/चर्च चौक मार्ग वापरा. राजीव गांधी ब्रिज ते एसबी जंक्शनसाठीही हाच पर्यायी मार्ग.
एसबी जंक्शन ते जे.डब्ल्यू. मेरिएट होटेल-बालभारती-पत्रकार भवन (एसबी रोड) बंद राहील; गणेशखिंड रोड-नरगिस दत्त रोड हा पर्याय. पत्रकार भवन ते लॉ कॉलेज रोड-प्रभात रोड-शेलार मामा चौक-कर्वे रोडसाठी भांडारकर रोड किंवा बीएमसीसी रोडने जा. या बदलांमुळे पुणे शहरात वाहतूक सुरळीत राहील आणि स्पर्धा यशस्वी होईल, असा विश्वास आयोजकांचा आहे. पुणेकरांनी मार्गदर्शन पालन करून ट्रॅफिक जॅम टाळावा.