Raj Thackeray  
महाराष्ट्र

Raj Thackeray : सरसंघचालक मोहन भागवतांच्या 'त्या' विधानावरुन राज ठाकरेंची टीका, म्हणाले...

नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दोन दिवसीय व्याख्यानमालेत सरसंघचालक मोहन भागवत यांनी एक वक्तव्य केलं.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Raj Thackeray) नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दोन दिवसीय व्याख्यानमालेत सरसंघचालक मोहन भागवत यांनी एक वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्याबाबत राज ठाकरे यांनी ट्विट करत मोहन भागवत यांच्यावर टीका केली आहे. मोहन भागवत म्हणाले की, '८ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईतल्या एका कार्यक्रमात सरसंघचालक श्री. मोहन भागवत यांनी, भाषेबद्दल आग्रही राहणे, त्यासाठी वेळेस आंदोलन करणे हा एक आजार आहे अशा आशयाचं विधान केलं.

या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलावण्यात आले होते, त्यातले काही हजर देखील होते ! परंतु मोहनराव भागवतांना एक गोष्ट सांगू इच्छितो की ती सर्व मंडळी तुमच्या प्रेमाखातर आली नव्हती तर ती नरेंद्र मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे आली होती ! नाहीतर आजवर का कोणी या असल्या रटाळ प्रवचनांना आले नाहीत? त्यामुळे ती मंडळी आपल्यासाठी आली होती या गैरसमजातून प्रथम आपण बाहेर या. असो . . . मुळात भाषावार प्रांतरचना या देशात का करावी लागली हा इतिहास भागवतांना निश्चितच माहीत असावा असे आम्ही समजतो ! भाषेबद्दलचं प्रेम, प्रांताबद्दलचं प्रेम हा जर भागवतांना आजार वाटत असेल तर त्यांच्या निदर्शनास हे आणून देऊ इच्छितो की हा आजार या देशातील बहुसंख्य राज्यांमध्ये आहे.'

'दक्षिणेत कर्नाटक ते तामिळनाडू इथे तीव्र भाषिक आणि प्रांतिक अस्मिता आहेत. तिकडे पश्चिम बंगाल असो, पंजाब असो अगदी गुजरात असो​, तिकडे पण ही भावना आहे. ही भावना नक्की काय आहे हे कधी भागवतांनी समजून घेतली आहे का? जेंव्हा देशातील ४ / ५ राज्यातील लोकांच्या झुंडीच्या झुंडी वेगवेगळ्या राज्यात जातात, तिकडे आगाऊपणा करतात, तिथल्या स्थानिक संस्कृतीला नाकारून, तिथल्या भाषेचा अपमान करतात, स्वतःचे मतदारसंघ तयार करतात​, तेंव्हा स्थानिकांच्यात रोष तयार होतो आणि त्यातून उद्रेक तयार होतो. याला तुम्ही आजार म्हणणार? आणि जर तुमच्या लेखी हा आजार असेल तर तो आजार आपल्या गुजरातमध्ये पण पसरला आहे. गुजरातमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारच्या हजारो लोकांना जेंव्हा पळवून लावलं तेंव्हा तिकडे जाऊन समरसतेचे धडे का नाही दिलेत? असेच धडे कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश ते पंजाब ते पश्चिम बंगाल इथे जाऊन का नाही दिलेत ?'

'मराठी माणूस सहनशील आहे पेक्षा इथले सत्ताधारी लिबलिबित कण्याचे आहेत म्हणून भागवतांची हिंमत होते. काही महिन्यांपूर्वी निवडणुकीच्या तोंडावर भय्याजी जोशींनी मुंबईची भाषा ही फक्त मराठी नाही तर ती गुजराती पण आहे अशा आशयाचं विधान करत मराठी माणसाला डिवचत गुजराती भाषिकांना चोंबाळण्याचा प्रयत्न केला. हे सगळं करून अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा कसा होईल हे पाहिलं. मुळात स्वतःला अराजकीय संघटना म्हणवून घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या भानगडीत मुळात पडायचंच कशाला? संघाच्या कामाबद्दल आमच्या मनात आदर आहे, पण म्हणून अप्रत्यक्ष राजकीय भूमिका घेण्याच्या भानगडीत पडू नये. आणि पडायचंच असेल तर देशभरात हिंदी (जी मुळात राष्ट्रभाषा नाही ) लादणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा आणि मग आम्हाला समरसतेच्या गोष्टी शिकवा.'

'यात हिंदुत्व आणून आम्हाला ज्ञानामृत पाजायचा प्रयत्न करू नका. मी अनेकदा सांगितलं आहे की ज्या वेळेस हिंदूंवर हल्ला होईल तेंव्हा आम्ही हिंदू म्हणून आमच्याकडून जे काही करणं शक्य होईल ते आम्ही करूच ! रझा अकादमीच्या दंगलीविरोधात मोर्चा काढणारा आणि मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात आंदोलन करणारा​, तसेच हिंदू सणांच्या वेळी मोठमोठ्याने लाऊडस्पीकर लावणे आणि मोठमोठ्याने डिजे लावून नागरिकांना त्रास होत असताना त्या विरोधात भूमिका घेणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हाच पक्ष होता. जे चूक ते चूकच हे आम्ही ठासून बोलतो. तसं मोहनराव आपण कधी बोलणार ? हिंदुत्वाच्या नावाखाली देशभरात जो धिंगाणा सुरु आहे , उत्तर भारतात कावड यात्रांमधे बिभत्स पद्धतीने महिलांना नाचवले जाणे , तसेच २०१४ ला बीफ एक्सपोर्ट मधे जो आपला देश ९ व्या क्रमांकावर होता तो आज दुसऱ्या क्रमांकावर आलाय आणि आपल्या देशात गोहत्येचं राजकारण करून जो तमाशा सुरू आहे आणि त्यातून माथी भडकवली जात आहेत त्यावर तुम्ही कधी बोलणार? त्या व्यापाऱ्यांच्या विरोधात सरकारला खडे बोल कधी सुनावणार? असो. तुम्ही काय करावं हे तुमच्यापाशी. आमच्यासाठी मराठी भाषा आणि मराठी माणूस हे अंतिम सर्वोच्च प्राधान्य आहे.या देशात भाषिक आणि प्रांतिक अस्मिता या राहणारच, तशाच त्या महाराष्ट्रात देखील राहणारंच ! हे आमचं स्वत्व आहे आणि त्याबद्दल जेव्हा जेव्हा असे प्रसंग उभे राहतील तेव्हा तेव्हा महाराष्ट्र त्वेषाने उभा राहील.' असे राज ठाकरे म्हणाले.

Summary

  • राज ठाकरे यांनी सरसंघचालक मोहन भागवतांवर टीका

  • व्याख्यानाला लोकं प्रेमाखातर आली नव्हती- राज ठाकरे

  • मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे आली होती -राज ठाकरे

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा