लोकसभेत सुरू असलेल्या डेडलॉकसाठी केंद्र सरकारच पूर्णपणे जबाबदार असून, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बोलू न देणं हा लोकशाहीचा गळा घोटणारा आणि देशद्रोहासारखा प्रकार असल्याचा घणाघाती आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केला आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याची तयारी विरोधकांनी सुरू केली असून, आज त्यासंदर्भात नोटीस देण्यात येणार असल्याचंही राऊत यांनी स्पष्ट केलं.
संजय राऊत म्हणाले, “लोकसभेतील डेडलॉक संपवण्याची जबाबदारी ही सत्ताधारी पक्षाची असते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी मलेशियात मौजमजा करत आहेत, अन्वर इब्राहिम यांना मिठ्या मारत आहेत. देशात संसद सुरू असताना विरोधी पक्षनेत्याला बोलू दिलं जात नाही आणि परदेशात जाऊन लोकशाहीवर व्याख्यानं दिली जातात. हा दुटप्पीपणा देशाच्या भविष्यासाठी धोकादायक आहे.”
राष्ट्रीय सुरक्षेवर चर्चा रोखणं गंभीर
राहुल गांधी राष्ट्रीय सुरक्षेसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यावर संसदेत भूमिका मांडू इच्छित असताना त्यांना रोखण्यात येत असल्याचं सांगत राऊत म्हणाले, “अशा वेळी विरोधी पक्षनेत्याला बोलू न देणं हा केवळ संसदीय परंपरांचा अपमान नाही, तर तो देशद्रोहासारखा प्रकार आहे.”
ते पुढे म्हणाले, “रशियाचे अध्यक्ष पुतीन भारतीय जनतेला तेल खरेदीबाबत मार्गदर्शन करत आहेत, त्यामुळे पंतप्रधान मोदींचा बिंग फुटलेला आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर ज्या पद्धतीने मोदी गुडघे टेकतात, ती अत्यंत चिंताजनक बाब आहे.”
ओम बिर्लांवर दबाव, सहकार्य नाकारलं
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या भूमिकेवर टीका करताना संजय राऊत म्हणाले, “काल राहुल गांधींनी सहकार्याची भूमिका घेतली. आम्हाला लोकसभा चालवायची आहे, अर्थसंकल्पावर चर्चा करायची आहे, असा स्पष्ट संदेश दिला. सर्व पक्षांचे खासदार ओम बिर्लांना भेटले. मात्र मोदी आणि अमित शहा यांचा प्रचंड दबाव त्यांच्या चेहऱ्यावर आणि बॉडी लँग्वेजवर स्पष्ट दिसत होता. त्यामुळेच त्यांनी कोणतंही सहकार्य स्वीकारलं नाही.”
भाजप हुकुमशाही पद्धतीने चालतो
“भारतीय जनता पक्षाचा नियम, कायदा आणि संविधानाशी काहीही संबंध उरलेला नाही. सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, निवडणूक आयोग यांसारख्या सर्व घटनात्मक संस्था भाजपाच्या टाचेखाली आहेत. अमित शहा आणि नरेंद्र मोदी हुकुमशाही पद्धतीने देश चालवत आहेत,” असा गंभीर आरोपही राऊत यांनी केला.
पुस्तक पायरेसी आणि पक्षफुटीवरून हल्लाबोल
वादग्रस्त पुस्तकाच्या पायरेसी प्रकरणावर बोलताना संजय राऊत म्हणाले, “पुस्तक प्रकाशित झालं नसेल तरी पायरेसीच्या कॉप्या फिरत आहेत. मोदींच्या काळात प्रत्येक गोष्टीची पायरेसी सुरू आहे. राजकीय पक्षांची पायरेसीसुद्धा याच सरकारने केली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पायरेसी मोदी-शहांनी केली. शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस हे मूळ पक्ष नाहीत.”
राहुल नार्वेकरांवरही टीका
पक्षांतरविरोधी कायद्याशी संबंधित समितीचं अध्यक्षपद राहुल नार्वेकर यांना दिल्याबद्दलही राऊत यांनी संताप व्यक्त केला. “ज्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीवर शिक्कामोर्तब केलं, पक्षांतरविरोधी कायद्याच्या धज्ज्या उडवल्या, त्यांच्याकडे ही जबाबदारी देणं म्हणजे डाकू मान सिंहकडे कायदा-सुव्यवस्था देण्यासारखं आहे,” अशी जहरी टीका त्यांनी केली.
हिंदी सक्तीवरून आरएसएसवर निशाणा
हिंदी भाषा सक्ती आणि त्रिभाषा सूत्रावर बोलताना राऊत म्हणाले, “भाषेसाठी नाही लढायचं तर मग कशासाठी लढायचं? भाषावार प्रांतरचना ही संविधानाने देशाच्या एकतेसाठी केली आहे. हिंदी ही प्रमुख भाषा आहे, पण प्रादेशिक भाषांवर आक्रमण होता कामा नये. मोहन भागवतांच्या आधीपासून हा देश आहे.”
अविश्वास ठरावाचा इशारा
सर्व विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली बैठक होणार असून, राहुल गांधीही उपस्थित राहणार आहेत. “आज पुन्हा सहकार्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र ओम बिर्लांचा रवैया असाच राहिला, तर त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याशिवाय पर्याय राहणार नाही,” असा स्पष्ट इशारा संजय राऊत यांनी दिला.