Sanjay Shirsat 
महाराष्ट्र

Sanjay Shirsat: अजित पवार विमान दुर्घटना प्रकरण, रोहित पवारांच्या शंकांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी; संजय शिरसाट यांची मागणी

Ajit Pawar Plane Accident: संजय शिरसाट यांनी रोहित पवारांच्या शंकांना गांभीर्याने घेत, अजित पवारांच्या विमान अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Published by : Dhanshree Shintre

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 28 जानेवारी 2026 रोजी झालेल्या दुर्दैवी विमान दुर्घटनेनंतर राज्यभरातून शोक व्यक्त केला जात असताना, या अपघाताबाबत विविध स्तरांतून प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत काही गंभीर शंका मांडल्या. त्यावर प्रतिक्रिया देताना मंत्री संजय शिरसाट यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे.

संजय शिरसाट म्हणाले की, “अजितदादांच्या निधनाने केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या विमान अपघाताबाबत अनेकांनी शंका व्यक्त केल्या आहेत. रोहित पवार यांनी जे मुद्दे उपस्थित केले आहेत, त्यांची दखल घेणे आवश्यक आहे. त्या शंकांचे समाधान होणे गरजेचे आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, या प्रकरणाची सीबीआय किंवा इतर कोणत्याही केंद्रीय उच्च संस्थेमार्फत सखोल चौकशी झाली पाहिजे, जेणेकरून सत्य समोर येईल.

रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत दुर्घटनेच्या वेळापत्रकाबाबत तपशील मांडले. त्यांच्या म्हणण्यानुसार, सकाळी 7.02 वाजता क्रू तयार झाले होते, तर 7.03 वाजता बारामती येथील हवामानाचा आढावा घेण्यात आला होता. सकाळी सुमारे 8.30 ते 8.45 दरम्यान अपघात घडला असावा, कारण 9 वाजता अजित पवार गंभीर जखमी असल्याची बातमी आली आणि 9.45 वाजता त्यांच्या निधनाची माहिती समोर आली. त्यांनी असेही नमूद केले की, संबंधित विमान दोन दिवसांपूर्वी सुरतला जाऊन आले होते.

हवामानामुळे अपघात झाल्याचा दावा कंपनीच्या मालकाने केला असला, तरी ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही फुटेजमधील दृश्ये वेगळेच चित्र दाखवत असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. त्यांच्या मते, हवामान इतके प्रतिकूल नव्हते आणि त्यामुळे यांत्रिक बिघाडाची शक्यता नाकारता येत नाही. “विमान उड्डाणापूर्वी आवश्यक तपासणी झाली होती का? नियमित देखभाल करण्यात आली होती का? मॅकेनिकल फेल्युअर झाले का?” असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

भावनिक शब्दांत रोहित पवार म्हणाले की, “सुरुवातीला हा अपघात केवळ स्वप्न असल्याचा भास होत होता. पण घटनास्थळी पोहोचलो तेव्हा वास्तव समोर आले. दादांचा स्वेटर, त्यांचे घड्याळ पाहिल्यावर मन सुन्न झाले. ते नेहमी घड्याळ 15 मिनिटे पुढे ठेवत; अपघातानंतर ते घड्याळ 9 वाजत असल्याचे दाखवत होते.” या पार्श्वभूमीवर संजय शिरसाट यांनी रोहित पवारांच्या मांडणीतील मुद्द्यांना गांभीर्याने घेत, “सत्य समोर येण्यासाठी निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी अत्यावश्यक आहे,” असे स्पष्ट केले. दरम्यान, या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, पुढील चौकशी आणि अधिकृत अहवालाची प्रतीक्षा सर्वांनाच आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा