Mumbai News 
मुंबई

Mumbai News : पर्यावरणासाठी अथक ध्यास; 100 प्लास्टिक कलेक्शन ड्राइव्ह्सचा प्रेरणादायी टप्पा

मुलुंड, पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने सातत्यपूर्ण आणि लोकसहभागावर आधारित उपक्रम राबवणाऱ्या अथक फाउंडेशनने १०० वी प्लास्टिक कलेक्शन ड्राइव्ह यशस्वीपणे पूर्ण करत एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.

Published by : Riddhi Vanne

राजेश गुप्ता

मुलुंड, पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने सातत्यपूर्ण आणि लोकसहभागावर आधारित उपक्रम राबवणाऱ्या अथक फाउंडेशनने १०० वी प्लास्टिक कलेक्शन ड्राइव्ह यशस्वीपणे पूर्ण करत एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. उत्साहपूर्ण वातावरणात आणि नागरिकांच्या अभूतपूर्व प्रतिसादात पार पडलेल्या या ड्राइव्हमुळे परिसरात पर्यावरण जनजागृतीची प्रभावी चळवळ उभी राहिल्याचे चित्र दिसून आले. या उपक्रमामागे अथक फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष अस्मिता गोखले यांचे सातत्यपूर्ण, निष्ठावान आणि समर्पित कार्य असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

या ऐतिहासिक ड्राइव्हला वॉर्ड क्रमांक १०५ मधील नवनिर्वाचित नगरसेविका अनिता वैती, वॉर्ड क्रमांक १०६ मधील नवनिर्वाचित नगरसेवक प्रभाकर शिंदे तसेच स्पेशल ऑलिंपिक भारताच्या अध्यक्ष आणि नामवंत लेखिका डॉ. मेधा सोमय्या यांची विशेष उपस्थिती लाभली. मान्यवरांनी पर्यावरण रक्षणासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज अधोरेखित करत अथक फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले.

या उपक्रमातील एक विशेष आणि भावनिक बाब म्हणजे, अथक फाउंडेशनच्या पहिल्या प्लास्टिक कलेक्शन ड्राइव्हला उपस्थित असलेल्या डॉ. मेधा सोमय्या या १०० व्या ड्राइव्हलाही आवर्जून उपस्थित राहिल्या. या सातत्यपूर्ण सहभागामुळे संस्थेच्या कार्यावर असलेला विश्वास आणि सामाजिक बांधिलकी अधोरेखित झाल्याचे आयोजकांनी सांगितले.

ड्राइव्हदरम्यान केवळ प्लास्टिक संकलनावर भर न देता समग्र कचरा व्यवस्थापनाचा आदर्श उभा करण्यात आला. हरियाली संस्थेच्या माध्यमातून ओल्या कचऱ्यापासून खत निर्मितीची प्रक्रिया राबविण्यात आली. अटेरो संस्थेमार्फत ई-वेस्टचे शास्त्रीय पद्धतीने संकलन करण्यात आले. स्वामी समर्थ संस्थेने पुनर्वापरयोग्य वस्तूंचे वर्गीकरण आणि काच संकलनाची जबाबदारी सांभाळली. तसेच संपूर्णम् संस्थेमार्फत भंगलेल्या मूर्ती आणि फोटो फ्रेम्सचे शास्त्रशुद्ध संकलन करण्यात आले. विविध संस्थांच्या समन्वयातून या उपक्रमाला व्यापक आणि शाश्वत स्वरूप प्राप्त झाले.

नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग, स्वयंसेवकांची अथक मेहनत, तज्ज्ञ संस्थांचे सहकार्य आणि मान्यवरांचे मार्गदर्शन यामुळे अथक फाउंडेशनला १०० ड्राइव्ह्सचा टप्पा गाठणे शक्य झाल्याचे आयोजकांनी नमूद केले. हा केवळ आकड्यांचा टप्पा नसून पर्यावरण रक्षणासाठी उचललेली १०० ठोस आणि परिणामकारक पावले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भविष्यातही ही मोहीम अधिक व्यापक स्वरूपात राबवून प्लास्टिकमुक्त आणि शून्य कचरा शहर घडविण्याचा संकल्प यावेळी पुन्हा व्यक्त करण्यात आला. पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारी स्वीकारून सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा