राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांच्या विलीनीकरणाबाबत काही दिवसांपूर्वी ठाम भूमिका मांडणारे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी आता संयमित भूमिका घेतली आहे. “आता विखुरलेलं राहून चालणार नाही” असे विधान सर्वप्रथम करणाऱ्या झिरवळांनी सध्या तरी विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम असल्याचे स्पष्ट केले.
मुंबईतील ‘देवगिरी’ बंगल्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक घेतली. काही आमदारांशी त्यांनी वैयक्तिक चर्चा केल्याचे समजते. अध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भातही त्यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या बैठकीत विलीनीकरणावर काही ठोस चर्चा झाली का, असा प्रश्न पत्रकार परिषदेत झिरवळांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “विलीनीकरणाचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. मात्र सध्या तरी अशा कोणत्याही चर्चेला विराम देण्यात आला आहे.”
पूर्वी दर मंगळवारी आमदारांची बैठक घेण्याची पद्धत होती. यानुसारच यावेळी सोमवारी बैठक घेण्यात आल्याचे झिरवळांनी सांगितले. प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघातील प्रश्न समजून घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. “सर्वांनी मनमोकळेपणाने आपली मते मांडावीत, हा उद्देश होता. सध्या विलीनीकरणाचा विषय चर्चेत नाही,” असे ते म्हणाले.
दरम्यान, मंत्रालयातील लाचखोरी प्रकरणामुळे झिरवळ अडचणीत आले होते. त्यांच्या कार्यालयातील लिपिकाला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. या संदर्भात झिरवळांनी पुन्हा स्पष्ट केले की, या प्रकरणाशी त्यांचा कोणताही संबंध नाही. संबंधित कर्मचाऱ्याने पैसे स्वतःसाठी घेतल्याची कबुली दिल्याचे त्यांनी नमूद केले.
मंत्रिपद जाण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की, “माझं कोणाशी वैमनस्य नाही. मंत्रिपदाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार केवळ मुख्यमंत्र्यांना आहे. माझ्या कामावर त्यांचा विश्वास आहे.” राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर झिरवळांची ही भूमिका महत्त्वाची मानली जात आहे.