(Devendra Fadnavis ) "हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र" या अभियानाअंतर्गत यावर्षी दहा कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली असून पुढील वर्षीही एवढ्याच प्रमाणात वृक्षारोपणाचे उद्दिष्ट आहे. ही मोहीम लोकचळवळ होण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, वन मंत्री गणेश नाईक, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण अत्यावश्यक आहे. महाराष्ट्राने गेल्या काही वर्षांत 33 कोटी व 50 कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट गाठले असून यंदाचे दहा कोटींचे लक्ष्य नक्की गाठले जाईल.
रोपे ही दीड ते तीन वर्षांची असावीत आणि ती टिकवण्यासाठी विशेष प्रयत्न व्हावेत. वृक्षसंवर्धनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, रिमोट सेन्सिंग आणि उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर करावा, असेही त्यांनी सुचवले. वृक्ष लागवडीसाठी दर्जेदार रोपे, योग्य जागा आणि भागीदारी महत्त्वाची असून स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषदा आणि सामाजिक संस्था यांचा सहभाग आवश्यक आहे. मोहीम यशस्वी होण्यासाठी चांगल्या नर्सऱ्यांची गरज असून खासगी नर्सऱ्यांनीही दर्जेदार रोपे उपलब्ध करून द्यावीत. झाडांची निवड प्रादेशिक हवामानानुसार व्हावी, तसेच ‘कॅम्पा’ निधीचा प्रभावी वापर व्हावा.
महामार्गांवर झाडे लावण्याचे काम वन विभागाकडे देण्यात येणार आहे. गडचिरोलीमध्ये उद्योगवाढ लक्षात घेता एक कोटी झाडे लावण्याचा विचार सुरू आहे. जोतिबाच्या डोंगरावरही मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण होणार आहे. बीड व लातूर जिल्ह्यांत कमी वृक्षसंख्या असल्याने तेथे विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले गेले आहेत.