(11th Admission ) अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला पुन्हा एकदा तांत्रिक अडचणींमुळे मोठा फटका बसला आहे. शिक्षण संचालनालयाने 10 जून रोजी जाहीर होणार असल्याची घोषणा केलेली पहिली गुणवत्ता यादी आता थेट 26 जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण प्रवेश प्रक्रिया विलंबित झाली असून, यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
यंदा दहावीचा निकाल 15 दिवस आधी म्हणजेच 21 मे रोजीच जाहीर करून अकरावी प्रवेश प्रक्रियेला गती देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र नोंदणीच्या सुरुवातीलाच तांत्रिक अडचणी आल्यामुळे अर्ज प्रक्रिया 26 मेपासून सुरू करण्यात आली. सातत्याने प्रणाली अडथळ्यांमुळे विद्यार्थी आणि पालकांना अर्ज भरण्यात त्रास सहन करावा लागला. अखेर 7 जून रोजी नोंदणी पूर्ण झाली. त्यानंतर 10 जूनला गुणवत्ता यादी जाहीर होणार होती. मात्र तांत्रिक सिस्टिममध्ये अडथळे कायम राहिल्याने आता यादी 26 जूनला जाहीर होणार आहे.
या प्रकारावर विद्यार्थी संघटना, पालक आणि शिक्षकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांचा आरोप आहे की, योग्य नियोजनाअभावी शिक्षण खात्याने विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळ केला आहे. हा सर्व प्रकार पाहता शिक्षक समुपदेशकांनी "लाडके विद्यार्थी योजना" लागू करून मोफत प्रवेश प्रक्रिया राबवावी, अशी मागणी केली आहे.
सुधारित नवे वेळापत्रक:
अंतिम गुणवत्ता यादी व शून्य फेरी वाटप – 11 जून
शून्य फेरी प्रवेश – 12 ते 14 जून
नियमित फेरी 1 चे वाटप – 17 जून
प्रवेश जाहीर – 26 जून
महाविद्यालयात प्रवेश – 27 जून ते 3 जुलै
दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी – 5 जुलै