(11th Admission Process) राज्यभरात यंदापासून अकरावी प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आली असून, 3 जून ही अर्ज नोंदणीची अंतिम मुदत आहे. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यात आणि विशेषतः ग्रामीण भागात या प्रक्रियेमुळे विद्यार्थी व पालक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. सातत्याने सर्व्हर डाऊन होत असल्याने अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत वेळ लागतोय. त्यातच अनेक भागांमध्ये इंटरनेटची सुविधा अपुरी असल्याने विद्यार्थ्यांना अर्ज भरता येत नाहीत.
कोल्हापूर जिल्ह्यातील 285 कनिष्ठ महाविद्यालयांमधील एकूण 66,010 जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 26 मेपासून प्रवेशासाठी अधिकृत संकेतस्थळ सुरू करण्यात आले असून, राज्यभरातून लाखो विद्यार्थी यावर एकाच वेळी नोंदणी करत असल्याने तांत्रिक अडचणी जाणवत आहेत. अर्ज भरताना अनेकांची वेबसाइट अडकते, फी भरताना अडचणी येतात आणि प्रत्येक अर्जासाठी दोन ते तीन तास लागतात.
शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या माहितीनुसार, केवळ दोन दिवसांत जिल्ह्यातील 9,166 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. मात्र, ग्रामीण भागातील पालकांमध्ये असंतोष दिसून येतो आहे. मोबाईल डेटा महाग असूनही इंटरनेटची गती कमी आहे, त्यामुळे अनेकांना ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करणं कठीण जात आहे.
या पार्श्वभूमीवर अनेक पालकांनी शाळांमध्ये ऑफलाईन अर्ज भरण्याची सुविधा द्यावी, अशी मागणी केली आहे. शाळांमधूनच मार्गदर्शन आणि अर्ज भरता आला तर विद्यार्थ्यांचे तणाव कमी होतील, अशी भावना पालक व विद्यार्थी व्यक्त करत आहेत.