अभिनेते अनुपम खेर यांना 60 आणि 61 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात "स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्काराने" सन्मानित करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत अनुपम खेर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्कार मिळल्यानंतर अनुपम खेर यांनी प्रतिक्रिया दिली की, “मी 3 जून 1981 रोजी मुंबईत आलो. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा गोल्ड मेडलिस्ट असूनही मी ज्या नोकरीच्या शोधात आलो होतो, ती नोकरीच नव्हती. मी चाळीच्या एका छोट्या खोलीत राहत होतो आणि मला त्या चाळीचा पत्ताही ठाऊक नव्हता. टॅलेंटपेक्षा तेव्हा हेअरस्टाईलला अधिक महत्त्व दिलं जात होतं. त्या काळात मला माझा पत्ता समजला अनुपम खेर, खेरवाडी, खेरनगर, बांद्रा इस्ट. आता त्या गोष्टींना 40 वर्षं झाली. या शहराप्रती माझं प्रेम अजूनही तेवढंच आहे. मुंबई हे मोठ्या मनाचं शहर आहे. इथे आलेल्या प्रत्येकाला एक संधी नक्की मिळते,”
पुढे ते म्हणाले की, “मी अजूनही माझ्या आयुष्याच्या किंवा करिअरच्या मध्यंतरापर्यंत पोहोचलेलो नाही. यानंतरही मी 30 वर्षं अशीच ऊर्जा आणि चिकाटीने काम करत राहीन.”