अनिल साबळे | छत्रपती संभाजीनगर : सिल्लोड तालुक्यातून अत्यंत धक्कादायक प्रकार आज समोर आला आहे. सीलबंद शासकीय पोषण आहारात सडलेला मृत भलामोठा उंदीर आढळून आला. यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे
सिल्लोड तालुक्यातील धोत्रा येथे महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभाग आयुक्तालय एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडीत पोषण आहार दिला जातो. विश्वजित प्रमोदसिंग जाधव या लहान बाळाचे पोषण आहार अंतर्गत मिळणारे धान्य 2 दिवसाआधी घरी आणले होते.
लहान मुलांना मिळणाऱ्या पोषण आहार अंतर्गत धान्य आणले. यातील गव्हाचे सिलबंद पॅकेटमध्ये काहीतरी असल्याची शंका आली म्हणून ते फोडून पाहिले असता त्यात सडलेला भलामोठा उंदीर निघाला. तसेच, पॅकेटमधून प्रचंड दुर्गंधी येत होती. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. अशा प्रकारे सरकारी यंत्रणा लहान मुलांच्या आरोग्याशी खेळत असल्याचे दिसून येत आहे. या प्रकारामुळे नागरिकांनी एकच संताप व्यक्त केला आहे.