पश्चिम रेल्वेवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या दरम्यान पश्चिम रेल्वेवर आज एकूण 89 लोकल रद्द असणार आहेत. पश्चिम रेल्वेमार्गावर शनिवारी दुपारी 2 ते रविवारी मध्यरात्री 1 दरम्यान पाचव्या मार्गावर आणि यार्ड मार्गावर 36 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत अप आणि डाऊन मार्गावर सुमारे आज 89 लोकल रद्द करण्यात येणार आहेत.
कांदिवली यार्डातील उन्नत आरक्षण कार्यालय तोडण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10:55 ते दुपारी 3:55 या कालावधीत मेगाब्लॉक घेण्यात येणार असून सकाळी 10:48 ते दुपारी 3:45 पर्यंत सुटणाऱ्या धीम्या लोकल गाड्या जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत.
तर दुसरीकडे हार्बर मार्गावर रविवारी सकाळी 11:40 ते ते संध्याकाळी 4:40 पर्यंत मेगाब्लॉक राहणार आहे. त्यामुळे सीएसएमटी ते वडाळा रोड आणि वाशी ते बेलापूर-पनवेल आणि सीएसएमटी ते वांद्रे-गोरेगाव या मार्गावरील सेवा सकाळी 11:16 ते सायंकाळी 4:47 पर्यंत बंद राहतील. या काळात पनवेल ते कुर्लादरम्यान विशेष सेवा धावतील.