संजय देसाई | सांगली : शिक्षण विभागात प्रशासन अधिकारी असल्याचे सांगून ४५ जणांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शैलेजा दराडे यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात तब्बल पाच कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
शैलजा दराडे या सध्या राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त आहेत. याबाबत सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील पोपटराव सूर्यवंशी या शिक्षकाने हडपसर ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी दादासाहेब रामचंद्र दराडे (रा. अकोले, ता. इंदापूर) आणि शैलेजा रामचंद्र दराडे (रा. रेव्हेरायीन ग्रीन्स, पाषाण) यांच्यावर गुन्हा दाखल केला.
दादासाहेब याने शैलजा या शिक्षण विभागात प्रशासनात अधिकारी असल्याचे सांगितले. त्यामुळे पोपटराव सूर्यवंशी यांनी दोन वहिनींना शिक्षक पदावर नोकरी लावण्यासाठी दादासाहेब यांनी पोपटराव यांच्याकडून जून २०१९मध्ये २७ लाख रुपये घेतले.
अशाच प्रकारे इतर ४४ जणांची लाखो रुपयांची फसवणूक केली. हा सगळा व्यवहार २०१९मध्ये झाला आणि शैलजा यांनी आपला दादासाहेब यांच्याशी काहीही संबंध नाही. भाऊ असल्याच्या नात्याने कोणीही त्याच्याबरोबर कसलाही व्यवहार करू नये, अशी जाहीर नोटीस ऑगस्ट २०२०मध्ये दिली होती, जी आमची दिशाभूल करण्यासाठी असावी, असा आरोप सूर्यवंशी यांनी केला आहे.