महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका निवडणुकांसाठी जागावाटपावर प्रमुख पक्षांत तळ्यातमळय सुरू आहे. कुणाला अधिक जागा हव्यात तर कुणी युती टाळत स्वबळाचा नारा देत आहेत. अशातच आम आदमी पक्षाने नागपूर महापालिकेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून आघाडी घेतली आहे. इतर पक्षांच्या चर्चेच्या गुऱ्हाळ्यात आप हा पहिला पक्ष ठरला असून, महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री भूषण ठाकूरकर आणि नागपूर शहराध्यक्ष अजिंक्य कळंबे यांच्यातर्फे दहा उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. पक्षाने ही निवडणूक लोकांच्या मूलभूत मुद्द्यांवर लढवण्याचे सांगितले.
वंचित बहुजन आघाडीनेही मुंबई महापालिकेसाठी १४७ उमेदवारांची यादी २४ डिसेंबरला जाहीर करण्याची घोषणा केली आहे. या यादीत बौद्ध, आदिवासी, ओबीसी, मुस्लिम, जैन आणि उत्तर भारतीय दलितांना प्रतिनिधित्व मिळणार आहे. आघाडीने मुंबईत विविध प्रश्नांवर सातत्याने आंदोलने केली असून, २५ नोव्हेंबरला छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर पावणे तीन लाख लोकांच्या सहभागाने ऐतिहासिक सभा घेतली. निवडणुकीपूर्वीच ताकद दाखवून दिल्याने पक्षाची तयारी दिसून येते.
परभणी महापालिकेतही काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांनी जाहीर केले. कुठल्याही पक्षाशी आघाडी न करता स्वतंत्र लढत असून, पाचही ठिकाणी मजबूत स्थिती असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निवडणूक जाहीर होताच उमेदवारी मुलाखती सुरू झाल्या असून, १५ जानेवारीला मतदान आणि १६ तारखेला निकाल येणार आहेत. या निवडणुकीतील अंतिम रंग काय असेल याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.