थोडक्यात
‘लाडकी बहीण’ योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे समोर
लाडकी बहीण योजनेत 8 हजार सरकारी कर्मचारी लाभार्थी
15 कोटींची रक्कम वसूल करणार
(Ladki Bahin Yojana)महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरु करण्यात आलेल्या लोकप्रिय ‘लाडकी बहीण’ योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिलांसाठीच मर्यादित आहे. मात्र, सरकारी तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांनी नियम धाब्यावर बसवून या योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे.
अधिकृत आकडेवारीनुसार अशा बोगस लाभार्थ्यांची संख्या 8 हजारांहून अधिक असून, त्यांच्या वेतन व पेन्शनमधून जवळपास 15 कोटी रुपये वसूल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. वित्त विभागाने संबंधित विभागांना थेट रक्कम कपात करण्याचे आदेश दिले आहेत.
महिला व बालकल्याण विभागाने माहिती-तंत्रज्ञान विभागाच्या मदतीने लाभार्थ्यांची यादी तयार केली आहे. यात जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक, विविध शासकीय विभागातील महिला कर्मचारी तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. संबंधितांकडून ही रक्कम टप्प्याटप्प्याने किंवा एकरकमी वसूल केली जाणार आहे.
दरम्यान, दोषी ठरलेल्या कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र दिवाणी सेवा नियम 1979 अंतर्गत शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे. शासनाने या प्रकरणाकडे गंभीरतेने पाहिले असून, येत्या काही दिवसांत दंडात्मक निर्णय जाहीर होण्याची अपेक्षा आहे.
विशेष म्हणजे, ही योजना विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर करून 3,600 कोटींची तरतूद करण्यात आली होती. मात्र, मोठ्या प्रमाणात बोगस अर्ज आढळल्याने सरकारने काटेकोर तपासणी सुरू केली आहे. शासनाचा उद्देश हा लाभ केवळ पात्र व खरंच गरजू महिलांपर्यंत पोहोचवण्याचा असून, पारदर्शकतेसाठी ही मोहीम राबवली जात आहे.