नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात राज्याचे राजकारण पुन्हा एकदा हादरवणारा दावा समोर आला आहे. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटातील तब्बल २२ आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचा गौप्यस्फोट करताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आधीच तणावपूर्ण वातावरणात सुरू असलेल्या अधिवेशनात या वक्तव्यामुळे चर्चांना अधिक उधाण आले.
पत्रकारांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले की, विरोधी पक्षनेत्याच्या निवडीवरून मुद्दाम अफवा पसरवल्या जात आहेत. “ही बातमी कोणी, केव्हा आणि का पेरली हे आम्हाला माहिती आहे,” असा टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला. याच दरम्यान त्यांनी अचानक दावा केला की, शिंदे गटातील २२ आमदार मुख्यमंत्र्यांच्या पूर्ण नियंत्रणाखाली असून ते लवकरच भाजपमध्ये उडी मारू शकतात.
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, या आमदारांची मागील वर्षभरातील सर्व कामे मंजूर करण्यात आली आहेत. त्यांना हवा तो निधी देण्यात आला. “उठ म्हटलं की उठायचं आणि उडी मार म्हटलं की उडी मारायची, अशा स्थितीत हे आमदार आले आहेत,” असे ते म्हणाले. यामध्ये एक जण स्वतःला ‘व्हाईस कॅप्टन’ म्हणवतो, असा हलकासा पण थेट टोला त्यांनी लगावला.
या वक्तव्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तात्काळ दिली. आदित्य ठाकरेंचा दावा फेटाळून लावत फडणवीस म्हणाले, “असं काहीही म्हणणं सोपं असतं. उद्या कोणी हेही म्हणेल की आदित्य ठाकरेंचे २० आमदार भाजपकडे येत आहेत. अशा बोलण्याने काही घडत नाही.” त्यांनी स्पष्ट केलं की, शिंदे गट हा त्यांचा मित्र पक्ष असून त्यांचे आमदार ‘घेणे-पाडणे’ असे राजकारण भाजप करत नाही.
दरम्यान, विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदावरून आधीच वादंग निर्माण झाले असताना, आदित्य ठाकरेंच्या या दाव्यामुळे नवे राजकीय समीकरण घडण्याची शक्यता चर्चेत आली आहे. शिंदे गटातील नाराजांची संख्या वाढत असल्याच्या अफवाही काही दिवसांपासून पसरत होत्या. आता आदित्य ठाकरेंच्या वक्तव्याने त्या पुन्हा ताज्या झाल्या आहेत. राज्यातील सत्ता समीकरणाला नवीन कलाटणी देणारी ही घटना पुढे कोणते वळण घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.