थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Rohit Pawar) आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. मुंबई, पुणेसह राज्यातील २९ महापालिका निवडणुकीची घोषणा करण्यात आली. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जांगासाठी ही निवडणूक होणार आहे.
23 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीमध्ये महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत, तर 31 डिसेंबर रोजी उमेदवारांच्या अर्जाची छाननी होणार आहे. तर 2 जानेवारी 2026 पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहेत. 3 जानेवारी रोजी चिन्हाचं वाटप होणार असून 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार ट्विट करत म्हणाले की, 'खरंतर निवडणूक आयोग कुणासाठी थांबत नसतो ती एक स्वायत्त संस्था आहे. मात्र काल दिवसभराचा घटनाक्रम पाहता निवडणूक आयोग कशाची तरी वाट पाहत असल्याचे जाणवले. काल सत्ताधारी नेत्यांनी अनेक उद्घाटने केली मतदारांना प्रभावित करण्यासाठी अनेक नवीन घोषणा केल्या आणि हे सर्व झाल्या नंतर निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन निवडणुका जाहीर केल्या, असे म्हणायचे का?'
'हा सर्व घटनाक्रम पहिल्यानंतर नेमकं कोण कोणासाठी काम करतंय आणि कोण कोणाचं ऐकतंय हे स्पष्टं होतं. लोकशाहीची अशी गळचेपी होताना मात्र आम्ही अनेक कारवाया होऊन देखील लोकशाही वाचवण्यासाठी लढत आहोत, मात्र अशा एकाधिकारशाहीमुळे खऱ्या अर्थाने लोकशाही टिकेल का, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.' असे रोहित पवार म्हणाले.
Summery
मुंबई, पुणेसह राज्यातील २९ महापालिका निवडणुकीची घोषणा
15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार
महापालिका निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया