माथाडी कामगारांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करून त्यांना रेल्वे व बसने प्रवास करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने केली आहे.
शासनाने तत्काळ याविषयी अध्यादेश काढला नाही तर बाजार समितीसह इतर मार्केटमधील काम शनिवारी बंद करण्याचा इशारा संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र पाटील यांनी दिला आहे. यामुळे पाचही मार्केटमधील जीवनावश्यक वस्तूंचा व्यापार ठप्प होण्याची शक्यता आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील धान्य, भाजीपाला, फळ, मसाला व धान्य मार्केट सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. पण या कामगारांना मार्केटमध्ये ये-जा करण्यासाठी रेल्वे व बसने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २२ एप्रिल रोजी कामगार नेत्यांची बैठक घेतली.
दरम्यान, या बैठकीत माथाडी संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र पाटील यांनी माथाडी कामगारांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करण्याची मागणी केली होती, परंतु यानंतरही शुक्रवारी सानपाडा रेल्वे स्टेशनमध्ये माथाडी कामगारांना प्रवास करण्यास मनाई करण्यात आली. पाटील यांनी रेल्वे स्टेशनला जाऊन व्यवस्थापनाशी चर्चा केली. जोपर्यंत शासना सूचना देत नाही तोपर्यंत प्रवास करू देऊ शकत नाही, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.