(Manikrao Kokate) कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा मोबाईलवर रमी गेम खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने माणिकराव कोकाटे यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. याच्याआधी मंत्री माणिकराव कोकाटे हे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे अनेकदा वादात अडकले होते.आता या व्हिडिओमुळे त्यांच्यावर टीका होत आहे.
राजकीय वर्तुळातून यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यातच आज कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या विविध योजना जाहीर केल्या आणि ऑनलाईन रमी खेळण्याबाबत सुरु असलेल्या चर्चांवर देखील प्रतिक्रिया दिली आहे.
माणिकराव कोकाटे म्हणाले की,"खरं तर ही घटना इतकी छोटी आहे, त्याला इतकं लांबवलं का गेलं काही माहित नाही. रमी खेळत असताना आपला मोबाईल नंबर त्याला जॉईन करावा लागतो,रजिस्टर बँकेचा अकाउंट तुम्हाला संलग्न करावा लागतो. अशा प्रकारचा कुठलाही अकाउंट नंबर आणि मोबाईल नंबर माझा रमी गेम संदर्भात रजिस्टर नाही. मी माझा मोबाईल नंबर आणि बँक अकाउंट डिटेल्स देऊन याची चौकशी करायला सांगणार आहे. तर तुम्हाला त्यावेळेस जाणवेल की मी आजपर्यंत एक रुपयासाठी सुद्धा ऑनलाईन रमी खेळलो नाही. "
"मला रमी खेळताच येत नाही. अशा प्रकारचा आरोप बिन बुडाचा आणि चुकीचा आहे. कारण नसताना माझी राज्यात बदनामी केली आहे. ज्या नेत्यांनी माझ्या विरोधात बदनामीचे षडयंत्र रचलं त्यांना मी कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही. मोबाईलवर दिसणाऱ्या रमी विषयी ती एक जाहिरात होती. मी ओएसडी कडून मोबाईल मागवून घेत माहिती पुढे सादर करण्यासाठी मोबाईलमधून ओएसडी यांना मेसेज करत होतो आणि तेव्हा ती रमीची जाहिरात सारखी मोबाईलवर येत होती. आलेली जाहिरात मला स्किप करता आली नाही."
"मी आजवर शेतकऱ्यांच्या हिताचे इतके निर्णय घेतले त्या संदर्भात कोणी काही बोलत नाही. यामध्ये जे जे कोणी दोषी असतील त्या सगळ्यांचे सीडीआर चेक करा आणि त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांना करणार आहे. ज्या शेतीमध्ये पीकच नाही अशा शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई शेतकऱ्यांना कशी द्यायची? ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पिके आहेत आणि त्याचं नुकसान झालंय अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवण्याचे आदेश मी दिले आहेत. ज्या शेतीमध्ये कुठलेही पीक येत नाही अशा शेतीमध्ये ढेकळाचे पंचनामे कसे करायचे हे जर मला अधिकाऱ्यांनी समजून सांगितलं तर मी तेही करायला सांगेन. राजीनामा देण्यासारखं घडलं काय आहे?, मी कोणता निर्णय शेतकऱ्यांच्या विरोधात घेतला आहे की मी गुन्हेगार आहे. माझा चालताना पाय तिरका पडला तरी त्याचा विपर्यास होऊन वेगवेगळ्या प्रतिक्रिया समाज माध्यमातून उमटतात."
"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीडियावरती विश्वास ठेवून स्टेटमेंट केलेलं दिसतं आहे. मुळात माझी बाजू मी आत्तापर्यंत मुख्यमंत्र्यांकडे खरी मांडली नाही. मी 25 वर्षापासून विधानसभेमध्ये कार्यरत आहे विधानसभेचे सगळे नियम अटी मला माहित आहेत" असे कोकाटे म्हणाले.
"नवीन मोबाईल असल्यामुळे मला ते समजत नव्हतं. नंतर मी ती जाहिरात स्किप केली आणि स्किप केल्यानंतरचा मोबाईलमध्ये पाहतानाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलाच नाही. या 15 सेकंदाचाच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला आहे. "मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभेचे अध्यक्ष यांना पत्र देऊन या प्रकरणाची चौकशी करायला लावणार आहे. आणि या चौकशीत जर मी दोषी आढळलो तर मी राज्यपालांकडे जाऊन राजीनामा देईन. व्हिडिओ कोणी काढला हे मला माहिती नाही, ते चौकशी अहवालातून समोर येईलच." असे माणिकराव कोकाटे म्हणाले.