छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यात आज भव्य पिंक ई-रिक्षा वितरण सोहळा करण्यात आला. या सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उपस्थितीती लावली होती. महिला सशक्तिकरणाचे नवे पर्व म्हणून राज्य शासनाच्या उपक्रमाकडे पाहिले जात आहे. या कार्यक्रमात पिंक ई-रिक्षा योजनेअंतर्गत लाभार्थी असलेल्या महिलांना वाहनांचे वितरण करण्यात आले. उपमुख्यमंत्री मा. अजित पवार यांच्या हस्ते हे वितरण करण्यात आले. यावेळी त्यांनी लाभार्थी महिलांचे मन:पूर्वक अभिनंदन करत पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व सशक्त बनवणे, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, आत्मविश्वास वाढवणे आणि समाजात त्यांना महत्त्वपूर्ण स्थान मिळवून देणे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केल्यास त्या प्रत्येक निर्णय अधिक आत्मनिर्भरतेने घेतात, असे अजित पवार यांनी आपल्या भाषणात नमूद केले आहे.
“कुटुंबातील एक मुलगी शिकली, तर ती संपूर्ण कुटुंबाला शिकवते. तीच घराची लक्ष्मी असते. पिंक ई-रिक्षा या महिला प्रवाशांसाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहेत. महिला प्रवाशांनी या रिक्षांना प्राधान्य द्यावे. पुरुष प्रवासी घेताना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांचा फोटो काढून कुटुंबियांना पाठवावा,”असा सल्ला अजित पवार यांनी महिलांना दिला. राज्य सरकार म्हणून महिलांना प्रगतीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही ठोस पावले उचलत आहोत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारच्या पाठिशी विश्वासाने उभ्या राहिलेल्या सर्व भगिनींना व मायमाऊलींना अजित पवार यांनी मन:पूर्वक धन्यवाद दिले. त्याबरोबरच महायुती सरकार भविष्यातही त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पहिल्या टप्प्यात दहा हजार पिंक ई-रिक्षांचे वाटप करण्यात येणार असून सुरुवातीला महाराष्ट्रातील आठ प्रमुख शहरात पिंक ई-रिक्षांचे वाटप केले जाईल, पुढे जावून उर्वरित शहरांचा सुद्धा निश्चितपणे विचार केला जाईल असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.