पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) भाजपविरोधात लढत आहे. प्रचार सुरू झाल्यापासून अजित पवारांनी भाजपच्या धोरणे, स्थानिक नेतृत्व आणि विकास कामांच्या श्रेयवादावर टीका केली.
यावर आज (६ जानेवारी) महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित करून 'मागची पाने चाळू नका' असा इशारा दिला. भाजपा नेते आशिष शेलार यांनी वीर सावरकरांचा मुद्दा आणला. या वादात आता अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बावनकुळे यांनी २०१७ च्या पुणे महापालिकेतील राष्ट्रवादी सत्तेचा उल्लेख करत 'मागची पाने चाळली तर बोलता येणार नाही' म्हटले. यावर अजित पवार म्हणाले, "त्यांना पाने चाळण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे, जरूर वापरावा. मी माझी भूमिका मांडतोय, तेही त्यांची मांडतील. जनता जनार्दन सर्वस्व आहे. जनता ऐकून घेईल आणि ज्याचे पटेल त्याला मत देईल."
अजित पवार पत्रकारांवर भडकले
शेलार यांनी 'तुम्हाला वीर सावरकरांचे विचार मान्य करावे लागतील' असा प्रश्न विचारला. यावर अजित पवार पत्रकारांवरच भडकले, "तुम्हाला विकासाची काही पडलेली नाही. आमच्यात अंतर वाढवण्यासाठी प्रश्न विचारता. मी महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित करतोय. तिथल्या प्रश्नांना उत्तर देईन. इतर प्रश्नांना नो कमेंट. निवडणूक संपल्यावर प्रत्येक प्रश्नाला उत्तर देईन." या वादाने निवडणुकीचे चित्र गुंतागुंतीचे झाले आहे.