मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भोंगेबंदीप्रकरणावरून राज्यात चांगलेच वातावरण तापले आहे. भोंग्याच्या प्रश्नावरुन सध्या राज्यभर तणाव पसरला असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी माध्यमांना बोलताना राज ठाकरे यांना टोला लगावला. ध्वनीक्षेपकासंदर्भात न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची तंतोतंत अंमलबजावमी करायीच झाल्यास तो नियम राज्यातील सर्व धार्मिक स्थळांना लागू होईल. त्यामुळे कोणीही कायदा हातात घेण्याच्या भानगडीत पडू नये, तसे धाडस दाखवू नये, असा इशारा अजित पवार यांनी दिला.
आपल्या राज्यात जितकी धार्मिक स्थळे आहेत, त्यांनी सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत ध्वनीक्षेपक वापरण्यासाठी रितसर परवानगी घ्यावी. काहीही झाले तरी आवाजाची मर्यादा ही पाळावीच लागेल. जातीय सलोखा राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. कोणत्याही धार्मिक स्थळाकडून परवानगी घेण्यात आली नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. ते गुरुवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा ईद झाली त्यावेळीही बरीच चर्चा झाली. जेवढ्या मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त ठेवता येईल तेवढा ठेवण्याचं काम सरकारने केले.कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारीही घेतली, जे कोणी कायदा सुव्यवस्था अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील, त्यांना ज्या नोटिसा द्यायला हव्या होत्या, तेही केलं. त्यांनाही लक्षात आणून दिलं की तुम्हाला कोणाला कायदा हातात घेता येणार नाही. या सगळ्या गोष्टी घडत असताना मी सांगितलं की सर्वांना नियम सारखे असतील. तेव्हा मला टार्गेट केलं, असे अजित पवार यांनी म्हटले.
मी उत्तर प्रदेशची काही माहिती घेतली. जहांगीरपुरी दिल्ली येथील जातीय दंगलीनंतर उत्तर प्रदेशमध्ये तिथल्या सरकारने स्वत: गोरखपूर येथील गोरखमठावरील भोंगे उतरवले. तिथल्या प्रमुखांनीच भोंगे उतरवले आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन मधुरा येथील श्रीकृष्ण जम्नस्थान मंदिराचे भोंगे देखील उतरवण्यात आले. यानंतर तिथल्या प्रमुखांनी आवाहन केलं की मशिदीवरील भोंगे उरतवावे. त्यामध्ये कुठलाही आदेश काढला नाही. त्यांनी आवाहन केलं. त्यामध्ये कुठलीही कायदेशीर कारवाई केली नाही. पण, काही दिवसात तेथील परिसरात मोठ्याप्रमाणात मशिदीवरील तसेच मंदिरावरील भोंगे उतरवण्याचं काम झालंय. अधिकृत दुजोरा उत्तर प्रदेश पोलीस देत नाहीत, असेही अजित पवार यांनी सांगितले.
राज्यात तणाव निर्माण होऊ नये म्हणून गृहखात्याने पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे राज्यात तणाव निर्माण होणार नाही यासाठी जनतेने सरकारला आणि पोलिसांना शांतता व सुव्यवस्था टिकून राहण्यासाठी मदत करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.