मराठा आरक्षणाच्या लढ्यामुळे राज्यभर चर्चेत असलेले मनोज जरांगे पाटील यांनी अचानक आपले सर्व नियोजित दौरे रद्द करत पुण्याच्या दिशेने प्रयाण केल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी तातडीने पुण्याकडे रवाना होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे “असं नेमकं काय घडलं?” आणि “पुण्यात कुणाशी चर्चा होणार?” असे प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र, याबाबत जरांगे पाटील यांनी स्वतःच सविस्तर भूमिका स्पष्ट केली आहे.
साईबाबांच्या चरणी प्रार्थना, जनतेसाठी मागितलं साकडं
मनोज जरांगे पाटील यांनी इंग्रजी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर बोलताना ते म्हणाले की, “राज्यातील जनता आणि शेतकरी सुखी-समाधानी राहावा, हीच प्रार्थना मी साईबाबांच्या चरणी केली आहे. जनतेच्या हितासाठीच माझा सगळा संघर्ष आहे.”
पुन्हा आंदोलन होणार का? जरांगेंची स्पष्ट भूमिका
मराठा आरक्षणासाठी पुन्हा आंदोलन छेडले जाणार का, या प्रश्नावर उत्तर देताना जरांगे पाटील यांनी सध्या तरी आंदोलनाची गरज भासणार नसल्याचं संकेत दिले. “मला वाटत नाही की पुन्हा आंदोलनाची वेळ येईल. विखे पाटलांनी जबाबदारी घेतली आहे. समाजाने मुख्यमंत्री आणि विखे पाटलांवर विश्वास ठेवला आहे. मराठवाड्यासंदर्भातील जीआर निघालेला आहे आणि त्यानुसार पुढील प्रक्रिया पार पडेल, असं आम्हाला सांगण्यात आलं आहे,” असं ते म्हणाले. मात्र त्यांनी इशाराही दिला की, “जर आंदोलनाची वेळ आलीच, तर सरकारसाठी परिस्थिती कठीण होईल. समाजापेक्षा माझ्यासाठी मोठं कोणीच नाही.”
एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी पुण्याकडे धाव
मनोज जरांगे पाटील यांनी अचानक पुण्याकडे जाण्याचं कारण स्पष्ट करताना मोठा मुद्दा समोर आणला.
ते म्हणाले, “मी माझे सगळे दौरे रद्द करून पुण्याकडे निघालो आहे. एक ते दीड लाख एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थी सध्या गंभीर अडचणीत आहेत. त्यांची कुठलीही चूक नसताना त्यांना त्रास सहन करावा लागतोय. सरकारच्या चुकीमुळे जर एवढ्या मोठ्या संख्येने तरुणांना वाऱ्यावर सोडण्यात येत असेल, तर ही मोठी शोकांतिका आहे.” जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री कार्यालयातील ओएसडी आणि विखे पाटील यांच्याशी यासंदर्भात चर्चा केल्याचंही सांगितलं. “मी थेट पुण्यात जाऊन एमपीएससी विद्यार्थ्यांची भेट घेणार आहे. या प्रश्नावर तातडीने तोडगा काढावा, असा संदेश मी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवला आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
शेतकरी आणि बिबट्या हल्ल्यांवर सरकारवर जबाबदारी
राज्यात शेतकऱ्यांवर वाढत असलेल्या बिबट्यांच्या हल्ल्यांबाबतही मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला थेट जबाबदार धरलं.
“शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकटं येतात किंवा बिबट्यांचे हल्ले होतात, तेव्हा ही पूर्णपणे सरकारची जबाबदारी असते. राज्यातील जनतेचं पालकत्व सरकारने स्वीकारलेलं असतं. यंत्रणा सरकारकडे आहे आणि ती शेतकऱ्यांसाठी वापरली पाहिजे,” असं त्यांनी ठणकावून सांगितलं.
शेतकऱ्यांच्या स्थितीवर भाष्य करताना ते म्हणाले, “शेतकऱ्यांकडे एक मोठं हत्यार आहे, पण तो त्याचा वापर करत नाही. आत्महत्या करण्याची किंवा किडनी विकण्याची वेळ शेतकऱ्यावर येते. जो शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवेल, कर्जमुक्ती करेल, त्यालाच मतदान करायचं हा निर्णय शेतकऱ्यांनीच घ्यायला हवा.”
पुण्यातील भेटीकडे सर्वांचं लक्ष
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील पुण्यात नेमकी कोणती भूमिका घेतात, सरकारकडून काय प्रतिसाद मिळतो आणि या भेटीनंतर पुढील आंदोलनाची दिशा काय असेल, याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे.