राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागात लवकरच 15 ते 20 हजार पदांची भरती करण्यात येणार आहे. विविध वर्गवारीतील ही पदांची भरती असणार आहे. यासाठी मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली असून लवकरच ही भरती प्रक्रिया पार पडेल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.
विशेष म्हणजे कोरोना काळात सलग सेवा देणाऱ्या डॉक्टरांना सामावून घेण्यासाठी देखील सरकार सकारात्मक असल्याचंही देशमुख यांनी सांगितले आहे.
कोरोना संकट काळात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे नोकरीचे कंत्राट संपले असले तरी त्यांना आगामी काळात आणि इतर नोकर भरती वेळी सामावून घेण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यासाठी नोकर भरती प्रक्रियेत बदल करण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. त्यानंतर आता हा मोठा निर्णय झाल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.