राज्यातील काही महापालिकांनी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मांस विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून, त्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका (KDMC) यांनी 15 ऑगस्ट रोजी मांस विक्रीवर बंदीचा आदेश जारी केला आहे. या निर्णयानंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कल्याण-डोंबिवलीप्रमाणेच मालेगाव आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑगस्ट महिन्यात तीन दिवसांसाठी मांस विक्रीबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच नागपूर आणि अमरावती महापालिकांनीही स्वातंत्र्य दिनी ही बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
KDMCच्या निर्णयाच्या निषेधार्थ महापालिका कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी हातात जिवंत कोंबड्या घेऊन निषेध नोंदवला. "भाजप जातीय तेढ निर्माण करत आहे" असा आरोप करत काँग्रेसने या निर्णयाचा धिक्कार केला. आंदोलनकर्त्यांनी "महापालिका प्रशासनाचा धिक्कार" अशा घोषणा देत मांसबंदीचा निषेध व्यक्त केला.
तणाव लक्षात घेऊन महापालिका परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्य राखीव पोलीस दल (SRPF) तैनात करण्यात आले असून, KDMCच्या 100 मीटर परिसरात वाहनांना प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या बंदीविरोधात आक्रमक भूमिका घेत सरकारवर निशाणा साधला आहे. या निर्णयामुळे राज्यातील राजकीय व सामाजिक वातावरण आणखी पेटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.