अंधेरीतील न्यु इंडिया को-ओपरेटीव्ह बँकेवर आरबीआयने निर्बंध घातल्याने बँकेबाहेर ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण झाली आहे. बँकेमधून मोठ्या प्रमाणात पैसे काढण्यासाठी ग्राहकांची गर्दी निर्माण झाली आहे. या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसदेखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र ग्राहकांची गर्दी वाढत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान यावेळी तेथील ग्राहकांशी संवाद साधला असता त्यांनी पैसे अडकल्याची भीती व्यक्त केली आहे. ग्राहकांच्या म्हणण्यानुसार, सदर बँकेने सगळ्या प्रकारचे व्यवहार बंद केले आहेत. याबद्दलची आरबीआयने कोणतीही पूर्व कल्पना दिली नसल्याचेही ग्राहकांनी सांगितले आहे. त्यामुळे हे पैसे कधी काढता येणार? व्यवसाय कधी सुरु होणार? असे अनेक प्रश्न बँक ग्राहकांच्या मनात निर्माण झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळपासून येथे गर्दी जमा झाली आहे. नागरिकांच्या चेहऱ्यावर तणाव असलेला दिसून येत आहे.