मुंबईमधील अंधेर येथील न्यू इंडिया को-ऑपरेटीव्ह बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निर्बंध लावले आहेत. याबद्दलचे आदेश गुरुवारी बँकेला देण्यात आले. या आदेशांनुसार बँक पुढील सहा महीने कर्ज देऊ शकणार नाही. तसेच पैसे काढू शकणार नाहीत आणि खात्यावर भरूही शकणार नाहीत. या सगळ्या प्रकारानंतर ग्राहकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. मात्र आरबीआयने निर्बंध का लावले ? त्याबद्दल आता सविस्तरपणे जाणून घेऊया.
कारवाई का केली ?
आरबीआयने बँकेची परिस्थिती खराब असल्याचे सांगितले आहे. मात्र बँकेचे परवानापत्र रद्द न झाल्याचेही आरबीआयने स्पष्ट केले आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून न्यु इंडिया को-ऑपरेटीव्ह बँकेला नुकसान सहन करावे लागत होते. गेल्या वर्षी 30.75 कोटी रुपयांचा तोटा झाल्यानंतर मार्च 2024 च्या आर्थिक वर्षात 22.78 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.
ग्राहकांना पैसे मिळणार का?
आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, बँकेच्या ग्राहकांनी जे पैसे जमा केले आहेत त्यांना डिपॉजिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनमधून पाच लाखांपर्यंतची रक्कम मिळू शकते. मात्र त्यापेक्षा अधिक रक्कम मिळू शकणार नाही. यासाठी बँकेच्या ग्राहकांना अर्ज करावा लागेल आणि सगळी तपासणी पूर्ण झाल्यानंतरच 90 दिवसांच्या आत पैसे मिळतील. मात्र बँकेच्या ग्राहकांचे नुकसान होणार नाही, असेही म्हंटले जात आहे.
काय कार्यवाही करण्यात आली?
शुक्रवारी या बँकेच्या खराब प्रदर्शनाचा अहवाल देत या बँकेच्या संचालक मंडळ 12 महिन्यांसाठी बरखास्त करण्यात आले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी महाप्रबंधक श्रीकांत यांना प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.