महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी पत्रकार परिषदेत राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. यात मुंबई महानगरपालिकेसाठी १५ जानेवारीला मतदान होईल आणि १६ जानेवारीला निकाल जाहीर होईल. अवघा एक महिन्याचा कालावधी शिल्लक राहिल्याने सर्व राजकीय पक्ष आजपासून जोमाने प्रचारात उतरत आहेत. विशेषतः मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हालचालींवर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर दोन्ही गट एकत्र येण्याची शक्यता वाढली आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट)चे खासदार संजय राऊत आणि आमदार अनिल परब यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. तब्बल ४५ मिनिटे चाललेल्या या बैठकीत मुंबई महापालिका निवडणुकीतील युती आणि जागावाटपावर चर्चा झाल्याचे बोलले जाते. भेटीनंतर अनिल परब यांनी माध्यमांशी बोलताना सूचक विधान केले. मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) युतीची अधिकृत घोषणा लवकरच होईल आणि तारीख कळवली जाईल, असे त्यांनी सांगितले. ठाकरे बंधूंच्या युतीचा अंतिम निर्णय दोन्ही पक्षांचे नेते घेतील. मुंबई महापालिकेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला आणि इतर बाबींवर चर्चा सुरू आहे. शेवटचा निर्णय झाल्यावर पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली जाईल, असे परब म्हणाले.
पत्रकारांनी काँग्रेससोबत युतीचा प्रश्न विचारला असता परब यांनी स्पष्टपणे सांगितले की, याबाबत सध्या काही सांगता येणार नाही. सर्व चर्चांना अंतिम स्वरूप मिळाल्यावरच माहिती दिली जाईल. जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत चर्चा न सांगता फक्त निकाल जाहीर केला जाईल, असे त्यांनी ठणकावून सांगितले. ही युती मुंबईतील राजकारणाला नवे वळण देईल का, याकडे लक्ष केंद्रित झाले आहे. महायुती आणि इतर पक्षांच्या रणनीतींवरही या घडामोडींचा परिणाम होईल.