अमझद खान | कल्याण : दारू पिल्यानंतर दोन वेटरमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. चाकू, लाकडी ठोकळ्याने एकमेकांवर हल्ला केला. या हल्ल्यात एका वेटरचा मृत्यू झाला आहे. तर, दुसरा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवीमन्नन अय्यादेवर, असे आरोपीचे नाव असून सितप्पा उर्फ नटरायन अस मयत वेटरचे नाव आहे.
डोंबिवली निळजे परिसरातील एका हॉटेलमध्ये अवीमन्नन अय्यादेवर, सितप्पा उर्फ नटरायन हे दोघे काम करत होते. व त्याच हॉटेलमध्ये राहत होते. हॉटेल दुपारी एक वाजता बंद होत असे. त्यानंतर पुन्हा संध्याकाळी सहा वाजता सुरू होत असे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास हॉटेल बंद करून हॉटेल मालक घरी निघून गेला. यानंतर अवीमन्नन अय्यादेवर, सितप्पा उर्फ नटरायन या दोघांनी दारू पिली. त्यानंतर दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला. सितप्पा उर्फ नटरायन याने अवीमन्ननला लाकडी ठोकळ्याने मारहाण केली.
संतापलेल्या अवीमन्ननने सितप्पावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात सितप्पाचा जागीच मृत्यू झाला. तर अवीमन्नन गंभीर जखमी झाला होता. हॉटेल मालकाने पुन्हा हॉटेल उघडलं असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात अवीमन्ननला विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, अवीमन्नन देखील जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.