रेव्ह पार्टी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या व सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या आर्यन खानच्या अडचणीत वाढ झाली आहे. आर्यन खानचा जामीन अर्ज किल्ला कोर्टाने फेटाळला आहे. आता जामीनासाठी आर्यनला सत्र न्यायालयात अर्ज करावा लागणार आहे.
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याच्या जामीन अर्जावर कोर्टात प्रचंड युक्तीवाद रंगला. पण अखेर कोर्टाने आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला आहे. कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतला. पण किला कोर्टात जामीन अर्ज दाखल करता येऊ शकत नाही या मुद्द्यावर बोट ठेवून कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. आरोपींच्या जामीनासाठी त्यांच्या वकिलांना आता सेशन कोर्टात जावं लागेल. पण आर्यनसह इतर आरोपींना आजची रात्रदेखील जेलमध्ये काढावी लागेल.
न्यायालयाच्या या निकालानंतर आर्यन खानसह मूनमून धमेचा तसेच अरबाज मर्चंट यांना तुरुंगातच मुक्काम करावा लागणार आहे. तर दुसरीकडे मुंबई न्यायालयाच्या निकालाविरोधात आम्ही सत्र न्यायालकडे दाद मागू असे आर्यन खानच्या वकिलांनी सांगितले आहे.
मुंबई येथे एका क्रूझवर NCB ने 2 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री छापा टाकला होता. यात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला NCB ने ताब्यात घेतलं. NDPS act 8C, 20 B, 27 आणि 35 या कलमांतर्गत आर्यन खानसह इतर 8 आरोपींना अटक करण्यात आली.