(Ashadhi Wari 2025) राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते असून आतापर्यंत 681 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये 467 सक्रिय रुग्ण आहेत आणि सात जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात दोन कोविड रुग्ण आढळले असून त्यामुळे आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा आणि इतर राज्यांमधून दरवर्षी हजारो भाविक पंढरपूरच्या दिशेने पायी वारी करतात. त्यामुळे वाढत्या रुग्णसंख्येचा परिणाम यंदाच्या वारीवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राज्यातील नऊहून अधिक जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण आढळले असून, ही बाब गंभीर मानली जात आहे. देशपातळीवर एकूण 1,828 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यनिहाय आकडेवारीनुसार महाराष्ट्रात 681, केरळमध्ये 727, दिल्ली 104, गुजरात 183आणि कर्नाटकमध्ये 148 रुग्ण सापडले आहेत.
सरकारने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली असून विविध ठिकाणी तपासणी आणि सर्वेक्षण मोहिमा हाती घेण्यात आल्या आहेत. नागरिकांनीही स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. मास्क वापरणं, सामाजिक अंतर राखणं आणि सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक गर्दी टाळणं महत्त्वाचं आहे. घाबरून न जाता जबाबदारीने वागणं आवश्यक आहे. प्रशासनाकडून वारकऱ्यांसाठी विशेष आरोग्य सुविधा आणि तपासणी केंद्र उभारण्याचे नियोजन सुरू असून, आषाढी वारी सुरक्षित पार पाडावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.