(Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi ) विठू नामाचा जयघोष करीत लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं आज (गुरुवार, 26 जून) दुपारी 1 वाजता निरा नदीत पारंपरिक स्नान सोहळा पार पाडणार आहे. हा सोहळा पालखी सोहळ्यातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि भावनिक क्षण मानला जातो.
स्नानानंतर माऊलींची पालखी पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात प्रवेश करेल. यानंतर पालखीची सुरक्षा जबाबदारी पुणे पोलिसांकडून सातारा पोलिसांकडे औपचारिकपणे हस्तांतरित केली जाईल. दरवर्षीप्रमाणे यंदाही ही प्रक्रिया अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडणार असून, दोन्ही जिल्ह्यांतील पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
आजचा मुक्काम लोणंद या ठिकाणी असून, तेथे पालखी रात्री विसावणार आहे. लाखो वारकरी भक्त लोणंद येथे पोहोचले आहेत आणि वारीचे वातावरण हरिनामाच्या घोषाने भक्तिमय झाले आहे. वरील सर्व कार्यक्रम शांततेत पार पडावेत यासाठी स्थानिक प्रशासन, स्वयंसेवक आणि पोलिसांनी तयारी पूर्ण केली आहे.