मराठा आरक्षणाबाबत राज्य विधिमंडळाचं आज विशेष अधिवेशन घेण्यात येणार आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासाठी हे विशेष अधिवेशन असणार आहे. हे एक दिवसीय विशेष अधिवेशन असणार आहे. अधिवेशनाआधी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार असून सकाळी 11 वाजता अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. मागासवर्ग आयोगाचा अहवाल बैठकीत मांडण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता बबनराव तायवाडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बबनराव तायवाडे म्हणाले की, आज मराठा आरक्षणाचं विधेयक विधिमंडळाच्या पटलावर मांडून त्यावर चर्चा करुन प्रस्ताव पास करण्यात येईल अशी चर्चा सूरू आहे. मुख्यमंत्री वारंवार सांगत आहेत की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्यास कटिबद्ध आहोत मात्र ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणारं नाही.
इतर आरक्षणाला धक्का न लावता अतिरिक्त कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण दिल्यास ओबीसी समाजाचा त्याला कुठलाही विरोध राहणार नाही. आरक्षण कोर्टात टिकवण्याची जबाबदारी सरकार घेत आहे. जर असं झालं आणि ते कोर्टात टिकलं तर आम्ही त्याचे स्वागत करु. असे बबनराव तायवाडे म्हणाले.