(Bacchu Kadu Protest ) प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. अद्याप अन्नत्याग आंदोलनावर तोडगा निघालेला नाही आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी यांसह 17 वेगवेगळ्या मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.
बच्चू कडू यांचे अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीमध्ये आंदोलन सुरु असून अन्नत्याग आंदोलनामुळे बच्चू कडूंची प्रकृती खालावली आहे. बच्चू कडूंनी औषधं घेण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे मात्र उपचार घेण्यास बच्चू कडूंनी नकार दिला आहे.
अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या माध्यमातून सरकारशी बोलणं सुरू असल्याची माहिती मिळत आहे. बच्चू कडू यांचे वजन चार किलोंनी घटल्याची माहिती मिळत आहे. तोडगा न निघाल्याने बच्चू कडू हे अद्याप आंदोलनावर ठाम आहेत. अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अमरावतीतील तिवसा, नांदगाव, चांदूरबाजार, अचलपूर येथे आंदोलन होणार असल्याची माहिती मिळत आहे.
बच्चू कडू यांच्यासोबत अन्नत्याग आंदोलनाला बसलेले 60 कार्यकर्तेही पाणी पिणार नसल्याची माहिती मिळत असून आज बच्चू कडू यांच्या उपोषण स्थळी छत्रपती संभाजी राजे, शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, आमदार रोहित पवार भेट देणार आहेत. तसेच बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ त्यांचा मुलगा देवा सुद्धा आजपासून अन्नत्याग आंदोलनात सहभागी होणार आहे. तसेच बच्चू कडू यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलनस्थळी आज शेतकरी रक्तदान देखील करणार आहेत.