पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उमेदवाराच्या नावाची घोषणा केली. दिवंगत आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचं निधन झाल्याने पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. या मतदारसंघात आता १७ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार आहे.दरम्यान राष्ट्रवादीकडून जयंत पाटील यांनी ट्वीट करून भगीरथ भालके यांच्या नावाची घोषणा केली आणि त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. "शरद पवार यांच्या मान्यतेनं पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भगीरथ भारत भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार घोषित करण्यात येत आहेत. ते नक्की विजय होतील, असा आम्हाला विश्वास आहे. भगीरथ भालके यांना शुभेच्छा!," असं पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान भाजपाकडून समाधान महादेव आवताडे यांना मैदानात उतरवण्यात आलं आहे. तर राष्ट्रवादी भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट सामना असणार आहे.